शिरूर कासार (रिपोर्टर) सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांच्या विरुद्ध माहेरी राहून कायदेशीर लढाई लढणार्या विवाहितेला कोर्टाच्या तारखे दिवशी सासू-सासरा आणि नवरा यांनी घरातून बोलावून घेऊन तिच्या जवळील मुलगी ताब्यात घेत दाखल केलेली केस परत घे म्हणून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याच दरम्यान सासूने स्वत:जवळ असलेल्या कॅनमधून विवाहितेच्या अंगावर डिझेल टाकले. तर नवर्याने काडी ओढत तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच तिने आरडाओरड केल्याने घटनास्थळी लोक जमा झाले. सदरची खळबळजनक घटना ही काल शिरूर कासार येथी कोर्टापासून काही अंतरावर असलेल्या गोमळवाडा चौकात घडली. या प्रकरणी सासू, सासरा, नवर्याविरुद्ध कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर येथील रुपाली नामक विवाहितेचा 2019 साली उस्मानाबाद येथील शिक्षक कॉलनीत राहणारे गोपाळ कंदिले यांच्या सोबत झाला. लग्नानंतर काही काळ व्यवस्थीत गेला मात्र नंतर रुपाली हिस सासरच्यांकडून मानसिक व शारीरीक छळ होऊ लागला. त्यामुळे 2022 साली ती माहेरी शिरूर येथे वडिलांच्या घरी आली. शिरूर पोलिसात 11 जानेवारी 2022 रोजी सासरच्यांविरोधात तक्रार दिली. तेव्हापासून रुपाली ही माहेरीच आहे. सदरील केस बाबत रुपालीचे सासरे अरुण जगन्नाथ कंदिले, सासू निर्मला अरुण कंदिले व पती गोपाळ अरुण कंदिले हे तारखा करण्यासाठी शिरूर येथे येत आहेत. काल हे तिघे जण शिरूर येथे आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास पती गोपाळ कंदिले याने रुपाली हीस फोन करून मुलगी गार्गी हिला भेटायचे आहे, तिला घेऊन ये म्हणून सांगितले. रुपाली मुलीसह कोर्टाकडे जाणार्या रोहवर असलेल्या गोमळवाडा चौकात आली, त्यावेळी तिच्या हातातील मुलगी सासरच्यांनी ताब्यात घेऊन तिला ढकलून दिले. तुला आता मुलगी देणार नाही, असे म्हणत तिला धमकावणे सुरू केले, याच दरम्यान सासू निर्मला हिने तिच्या हातातील ड्रममधील डिझेल रुपालीच्या अंगावर टाकले. नवर्याने हिला आता जिवंत ठेवायचे नाही, असे म्हणत काडी पेटवली, त्या दरम्यान रुपालीने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने घटनास्थळी सुरेश कारभारी उगलमुगले, आसाराम त्रिंबक दगडे हे पळत गेले व रुपाली हिस सासरच्या लोकांच्या ताब्यातून सोडवले. सदरची घटना घडल्यानंतर रुपाली हिने शिरूर पोलिसात या तिघांविरोधात तक्रार दिली. त्यावरून सासू-सासरा आणि नवरा यांच्यावर पोलिसांनी कलम 307, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल केला.