रमाई आवास योजनेच्या
घरकुलांना मंजुरी कधी मिळणार?
बीड जिल्ह्यात 640 घरकुले मंजुरीच्या प्रतीक्षेत
बीड (रिपोर्टर): पंतप्रधान, रमाई आवास, शबरी आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य लाभार्थ्यांना दरवर्षी घरकुल मंजूर केले जातात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून घरकुल मंजुरीला संथगती आली. बीड जिल्ह्यातील रमाईच्या 640 घरकुलांना मंजुरी कधी मिळणार हे घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित लाभार्थी कार्यालयामध्ये चकरा मारू मारू बेजार आहेत. तरीही त्यांची नावे अद्यापही मंजुरी यादीमध्ये आलेली नाहीत. तसेच विभागीय आयुक्तांनी सर्व घरकुले मंजुर करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीही बीड जिल्ह्यातील त्या त्या पंचायत समित्यांमार्फत घरकुलांना वेळेवर मंजुरी दिली जात नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.
सर्वसामान्य नागरीकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी विविध घरकुल योजना सुरू करण्यात आल्या. घरकुलासाठी 1 लाख 20 हजार आणि रोहयोतून 18 हजार इतके पैसे मिळतात. बीड जिल्ह्यात रमाई, पंतप्रधान आणि शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. रमाईचे 640 घरकुले कधी मंजूर होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झालेले नाहीत. याबाबत संबंधित लाभार्थी अनेक वेळा त्या त्या पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून बेजार आहेत. तरीही प्रशासकीय पातळीवर याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसून येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या पावसाळ्याच्या दिवसात आता कधी घरकुलांना मंजूरी मिळणार आणि कधी त्याचे बांधकाम पुर्ण होणार, आता तरी वेळेवर प्रलंबीत सर्व घरकुलांना मंजुरी देऊन त्यांचे हप्ते खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.