जिल्हा परिषद समोर कामगार महिलेसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन
बीड (रिपोर्टर) केसापुरीच्या जि.प. शाळेतील शालेय पोषण आहार कामगाराला कसलीही पुर्वसूचना, लेखी नोटीस न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. या प्रकरणी शालेय पोषण आहार कामगार महिलेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जि.प. कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महिलेला पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी यांना महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेकडून दिलेल्या निवेदनात म्जहटले आहे की, कुठल्याही कामगाराला कामावरून कमी करण्यापूर्वी त्याला लेखी दोन ते तीन वेळेस सूचना दिल्या जातात, त्यानंतरही कामात सुधारणा न झाल्यास कामावरून काढले जाते. मात्र केसापुरी परभणी येथील शाळेवरील महिला कामगाराला कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आले आहे. यासाठी महिलेला आर्थिक मागणीही करण्यात आली आहे. सदरील कामगार महिलेला जाणीवपुर्वक त्रास दिला जात आहे. या महिलेला दोन दिवसात कामावर पुर्ववत न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. या वेळी प्रभाकर नागरगोजे, अशोक थोरात, मिराताई शिंदे, मोहन जाधव, राजाभाऊ राऊत, शौकत सय्यद, मिरा शिंदे, चंद्रकांत घिगे, दिक्षा गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.