बौद्ध महिलांची एकाच पोशाखात असलेली उपस्थिती ठरली सभेचे विशेष आकर्षण !
बीड प्रतिनिधी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे राजकीय वाटचाल करत असताना भारतीय जनता पार्टीने गलिच्छ राजकारण करत उभी शिवसेना फोडली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आणि आमच्या हक्काचा धनुष्यबाण गद्दारांच्या ताब्यात दिला. त्यामुळे ठाकरेंचा शिवसैनिक संतप्त झालेला असून बीड जिल्ह्यातील जो खरा शिवसैनिक आहे तो आपला हा संताप आणि राग मतपेटीतून व्यक्त केल्याशिवाय थांबणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयामध्ये जी मतांची निर्णायक आघाडी असेल ती आघाडी शिवसेनाच देईल असा विश्वास शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित जाहीर मेळाव्यातून व्यक्त केला.
बीड येथील पंचशील नगर,कृषी कॉलनी परिसरात शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी सायंकाळी 8 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. या जाहीर सभेला उपस्थित असलेले ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि बौद्ध समाज बांधव विशेषता एका पोशाखामध्ये उपस्थित असलेल्या शेकडो महिला सभेचे विशेष आकर्षण ठरल्या.या शिवसेनेच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार अँड उषाताई दराडे यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष अशोकराव येडे, युक्रांतचे पंडित तुपे, पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के के वडमारे, बाबू लव्हाळे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ महूवाले, शिवसेनेचे बीड तालुका प्रमुख गोरख अण्णा शिंगण, विधानसभा प्रमुख सुशील भैया पिंगळे,महिला आघाडी विधानसभा प्रमुख मीराताई नवले, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख महादेवराव पळसकर,अशोक सगळे, नितीन नवले यांच्यासह सय्यद नयूमभाई, दिलावर पठाण, अमित जोगदंड,ऑल इंडिया पॅंथरचे प्रेम कांबळे, सागर भालशंकर, आशाताई लोखंडे, आरती थोरात, राजश्री नवले, मथुराबाई तावरे, सोजराबाई तावरे,लीलावती तावरे, भिजाबाई तावरे, कौसाबाई घाडगे, सचिन आप्पा सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख गणेश वरेकर म्हणाले की, मातोश्री वरून जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटल्यानंतर शिवसैनिक अक्षरश ढसाढसा रडत होता. त्यावेळी भाजपा असा रडीचा डाव खेळून हसत होती अशा या निर्लज्ज भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये मतपेटीतून आपला विरोध दाखवणे आता शिवसैनिकांची नैतिक जबाबदारी आहे.बीड जिल्ह्यातील जो खरा शिवसैनिक आहे तो निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या घड्याळ या चिन्हावर आपले अमूल्य मतदान देऊन भाजपाने खेळलेल्या या रडीच्या डावाविरुद्ध राग व्यक्त करेल असा विश्वास आहे. गद्दार आणि खोके बहाद्दरांना त्यांची लायकी आणि जागा दाखवण्यासाठी लोकसभा हीच महत्त्वाची संधी मिळालेली आहे.या संधीच सोन निष्ठावंत शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या दिशाहीन असलेलं नेतृत्व आहेत. अशा नेतृत्वाला आणि जो पक्ष गद्दारांना सहकार्य करतो, भ्रष्टाचारांना आपलंसं करतो, त्या पक्षाला मुठमाती देणं गरजेचं आहे.मुंडे भगिनींनी बीड जिल्ह्याचा विकास काडीचाही केला नाही. केवळ विकासाचा भास निर्माण केलेला आहे. बीडला दरवेळी रेल्वेच गाजर दाखवलं जातं मात्र आता मतदार आंधळा राहिलेला नाही.जागृत झालेला मतदार भाजपाच्या उमेदवाराला घरी बसवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही.त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयाचा जो गुलाल लागेल तो बीड जिल्ह्यातील शिवसैनिकच प्रमुख भूमिका घेऊन लावेल असा विश्वास शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेने बोलावलेल्या कॉर्नर सभेला बीड शहर आणि विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिकाने उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. विशेष बाब म्हणजे यावेळी बौद्ध समाजातील महिला पांढरा शुभ्र साडीच्या पोशाखात सभेला उपस्थित राहून महाविकास आघाडीच्या मागे आम्ही मताचे विभाजन न होण्यासाठी खंबीरपणे उभे राहणार आहोत असा विश्वास देत असल्याने या महिला सभेचं विशेष आकर्षण ठरल्या
. चौकट… फुटीर राष्ट्रवादी आणि धोकेबाज भाजपाला मुठ माती द्या – अँड उषाताई दराडे
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांना आणि विशेषता महिलांना स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय आधार दिला ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब आहेत. भारतीय जनता पार्टीने राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. त्यामुळे त्या फुटीर राष्ट्रवादी मधील अजित पवारांना आता राष्ट्रवादीचे विचारांचे जे पाईक आहेत ते नाकारतील आणि आता त्यांना दादा म्हणण्याचा जो आमचा नैतिक अधिकार होता तो त्यांनी गमावलेला आहे. मतदारांनी या गद्दारांना आणि भ्रष्ट नीतिमत्ता असलेल्या भाजपाला जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करून बीड जिल्ह्यात नवा इतिहास निर्माण करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माजी आमदार अँड उषाताई दराडे यांनी या सभेतून केले. चौकट बौद्ध मतांचे विभाजन टाळण्यासाठी समाज आता वंचितच्या नव्हे तर महाविकास आघाडीच्या पाठीशी – रवी वाघमारे बौद्ध समाजाचे मतदान हे वंचितच्या पाठीशी एक मुखाने जाते.मतांच्या या विभाजनाचा फायदा अप्रत्यक्षरीत्या भाजपाला होतो. आघाडीचा उमेदवार पराभूत होऊन भाजपाचा उमेदवार त्यामुळे विजयी होतो. हे आता बौद्ध समाजाच्या मतदारांना देखील कळून चुकले आहे. त्यामुळे आता या लोकसभेत बौद्ध समाजाने आपल्या मतांचे विभाजन जर झाले तर त्याचा थेट फायदा भाजपला होत असेल तर तो टाळण्यासाठी यावेळी वंचितला मतदान न करता आपले अमूल्य मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पारड्यात टाकून खऱ्या अर्थाने या देशातील संविधान वाचवण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार केला असल्याचा विश्वास कामगार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी अण्णा वाघमारे यांनी या ठिकाणी सभेतून जाहीरपणे व्यक्त केला.समाज बांधव आणि बौद्ध समाजातील महिलांनी या सभेला पोशाखात उस्फूर्तपणे दाखवलेली प्रचंड उपस्थिती निश्चितच यावेळी परिवर्तन करेल आणि आपल्या मतांचे विभाजन न होऊ देता महाविकास आघाडीलाच विजयी करण्यामध्ये मोलाची कामगिरी पार पाडतील असा विश्वास देखील व्यक्त केला.