मुंबई (रिपोर्टर): 2019 मध्ये मी भाजपाची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र त्यानंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या, त्याकडे मी गांभीर्याने पाहिले नाही, असे म्हणत माझे राजकीय करिअर संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी करून पाठीत खंजीर खुपसण्याचे माझ्या रक्तात नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. मी राहुल अथवा सोनिया गांधी यांना प्रत्यक्षात-समोरासमोर कधीच पाहिले नाही, त्यांना भेटलेही नाही. मी लपूनछपून काहीच काम करत नाही. मी कोणताही निर्णय उघडपणे घेते, ती बातमी चालणार्या चॅनेलवर मानहाणीचा खटला दाखल करण्याचे सांगून अंतर्मुख होण्यासाठी मी दोन महिने सुट्टी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान वाटला असेल, माझ्यासाठी पक्षाचा निर्णय हा अंतिम असेल, असेही त्यांनी बोलून दाखविले.
मी 20 वर्षात कधीही सुट्टी घेतली नाही. मला आता त्याची गरज आहे. मला अंर्तमुख होण्याची गरज आहे. मी आमदार झाल्यावर माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यासमोर मी पुढे आली. त्या विचारधारेशी मला कधी प्रतारणा करावी लागेल किंवा चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे. मी राजकारणापासून 2 महिने सुट्टी घेऊन अंर्तमुख होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतायेत. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही. मात्र पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींची भाजपा सदैव राहावी यासाठी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता धडपडतेय. मी नक्षलग्रस्त भागात जाऊन, अन्नपाण्याची अपेक्षा न करता पक्षासाठी काम करतेय. असं असताना माझ्या नैतिकतेवर आणि विश्वासर्हतेवर शंका निर्माण होणे याने मला दु:ख वाटते असं त्यांनी सांगितले.त्याचसोबत राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन. हजारो, लाखो लोक मला काय करताय असा प्रश्न करतायेत. पक्षाचा आदेश मी कायमच मानत आलीय. 106 आमदारांच्या मनात अनेक गोष्टी आहेत. कुणी समोर येऊन बोलू शकत नाही. मी फक्त मुद्द्यांवर बोलले. कधीही नाराजी व्यक्त केली नाही. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. माझ्यावर आरोप झाले. पण सर्वांना उत्तरे दिली. मी ईश्वर साक्ष कथन करते, मी कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या पक्षप्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी राहुल गांधींना कधी भेटले नाही. माझे जे काही जगासमोर आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिक-पणाला खूप महत्व आहे. मी नाराज नाही पण दुखी आहे. माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे मी न्यायालयात लढाई लढणार आहे असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.