बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत ‘आता पवार साहेबांचं वय झालं, त्यामुळे आपल्याला भविष्याचा विचार करायचा, असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे’, माझं एवढच सांगणं आहे, तुम्ही माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं’, असा सवाल करत माजी आमदार अमरसिंह पंडितांबाबत भाष्य केलं होतं. त्यावर आज अमरसिंह पंडितांनी ‘श्रध्देय साहेब’, असे शिर्षक असलेले पोस्ट लिहित आपण असे सार्वजनिक अथवा खासगीतही कधीच म्हटले नसल्याचे सांगत आम्हा भावंडांवर श्री शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, अनेक वेळा निष्ठेने काम करताना संधी आणि प्रलोभणे मिळाले मात्र त्यावेळी कधी डगमगलो नाही. लाभापाई काही निर्णय घेणार नाही याची खात्री तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच, कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत, असेही म्हटले आहे.
माजी आ. अमरसिंह पंडित यांनी आज सोशल मिडियावर एक पोस्ट टाकून शरद पवारांच्या त्या वय झालेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. पवारांचा आणि अमरसिंहांचा सोबतचा फोटो या पोस्टवर टाकण्यात आलेला आहे. पोस्टमध्ये अमरसिंह लिहितात, ‘श्रध्देय साहेब, काल, आज आणि भविष्यातही तुमच्याबद्दल श्रध्दा आणि आदर कायम राहील. कालच्या सभेत आपण माझ्या तोंडी घातलेल्या वाक्याबाबत मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही. आपल्या कानी कोणी काय घातले हे मला माहित नाही, त्याविषयी जाणून घेण्यात स्वारस्यही नाही मात्र हे अत्यंत क्लेषदायक आहे, एवढेच सांगतो.’
आम्हा भावंडांवर श्री.शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले म्हणून नेतृत्व बदल केला असे तोडके विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा परंतु वैयक्तिक सुध्दा कोणाला बोललेलो नाही. तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. तुमच्या सोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली मात्र त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे.
कतुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत हेच मुळात पटत नाही… असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही, लाभापायी काही निर्णय घेणार नाही याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत.