गणेश सावंत
संताप…संताप…आणि संताप… मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून सराटे अंतरवली येथे उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. महिला, पुरुषांचे अक्षरश: डोके फोडले. अनेक महिला-पुरुष आंदोलक गंभीर जखमी झाले. अनेक पोलिसांनाही यात रक्त सांडावे लागले. हे पाप कुणाचे? माय-बाप सरकार जेव्हा पाच-पाच-दहा-दहा लाख लोकांचे मोर्चे निघाले, तेव्हा इकडची काडी तिकडे झाली नाही. शासकीय मालमत्तेचे नुकसान सोडा रस्त्यावर साधे पाण्याच्या पाऊचचे कवर पडले नाही. साधा कचराही पहायला मिळाला नाही. मराठ्यांचं आंदोलन हे जागतिक पातळीवर सन्मानजनक, आदरयुक्त पद्धतीने चर्चीलं गेलं. देशाने सोडा परदेशाच्या मिडियाने मराठ्यांच्या या आंदोलनाला कौतुकाच्या पुष्पमाळा घातल्या. मात्र काल असे मराठे का चवताळले? जाळपोळीवर का उतरले? त्यांच्यामध्ये एवढा संताप आणला कोणी? हा राग कोणामुळे आला? तर याचे उत्तर केवळ सराटे अंतरवलीत शांततेच्या मार्गाने उपोषण करणार्या मराठ्यांवर राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. खरचं त्या ठिकाणी लाठीहल्ला आणि गोळीबार करणे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती काय? तशी परिस्थिती झाली होती, तर फडणवीसांचं गृहखातं झोपला होता काय? गोपनीय विभागाकडून तिथल्या परिस्थितीची जाणीव यंत्रणेला नव्हती काय? शांततेच्या मार्गाने प्रकरण हाताळता येईल, अशी व्यूहरचना का आखण्यात आली नाही? प्रशासनाला तिथे अपयश का आले? असे एक ना अनेक प्रश्न पडलेले असताना
फडणवीस म्हणतात,
दगडफेक झाली
आमचा थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे, दगडफेक करण्यासारखी परिस्थिती आंदोलकांनी निर्माण केली की प्रशासन व्यवस्थेने निर्माण केली. लाठीहल्ल्याचे जेवढे व्हिडिओ आहेत, त्यापेक्षा दगडफेकीचे व्हिडिओ प्रशासनाच्या हाती किती लागल्या आहेत? आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे चार दिवसांपासून उपोषण शांततेच्या मार्गाने करत होते. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली होती. जोपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र तात्काळ देत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. मग त्यांच्या भूमिकेला चर्चेतून सोडवता आलं नसतं का? त्यांच्या सोबत काल त्याठिकाणी चर्चा सुरू होती. मग अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शेकड्याच्या घरात पोलीस का मागविण्यात आली? घटना घडण्यापूर्वी गावाला पोलिसांनी का घेरलं? जर तिथे शांतता होती, बैठक सुरू होती तर मग दगडफेक अथवा लाठीहल्ला होण्यापूर्वीच मोठ्या संख्येने पोलीस त्या ठिकाणी का आणण्यात आली होती? फडणवीस साहेब, तुम्ही काल तात्काळ एक प्रतिक्रिया दिली…. लोकांनी दगडफेक केली म्हणून पोलिसांना लाठीमार करावा लागला. पुढची प्रतिक्रिया तुमची राजकीय होती, आरोप-प्रत्यारोपाची होती. आंदोलकांच्या मागण्यांबाबत प्रतिक्रियेमध्ये ब्र शब्द नव्हता. याचाच अर्थ हे आंदोलन चेतते ठेवणे असा तर नव्हे! काल जे सराटे अंतरवलीत झाले ते अत्यंत निषेधार्हच परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला जे गालबोट लागले त्या गालबोटाचे पाप फडणवीसांच्या गृहविभागाने केले. आम्हाला काही पोलिस मित्रांनी सांगितले, ‘अहो दगडफेकीत
जखमी झालेले
पोलीस मराठाच आहेत,
तेही माणसच आहेत. होय, इथे जात-पात अथवा धर्म-पंथाचा सवाल नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या समतवेर चालणारा इथला प्रत्येक माणूस आहे. दगडफेक झाली म्हणून पोलिसांना लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असतील, गोळीबार करावा लागला असेल, परंतु ही परिस्थिती का आली? हे पाहणे अधिक गरजेचे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जरांगे यांना बळजबरीने उचलण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी उपस्थित आंदोलकांनी विरोध केला, त्यात रेटारेटी झाली आणि तात्काळ पोलीस यंत्रणा अॅक्शनमोडवर येत लाठीमार करत सुटली. याच्यामध्ये आंदोलकांचे डोके फुटले, महिला आंदोलक रक्तबंबाळ झाल्या. लहान मुले चेंगराचेंगरीत आडवे पडले. पोलीसही जखमी झाले. विशेष म्हणजे आम्ही जखमी पोलिसांचे फोटो पाहिले, काही बोटावर मोजण्याइतके पोलिसांचे डोके फुटले मात्र बहुतांशी पोलिसांच्या पायाला जखमा झाल्या. याचा अर्थ काय समजायचा, आंदोलकांनी दगडे केवळ पोलीसांचे पाय पाहून मारले की उपस्थित पोलीस आणि आंदोलकांत असा करार झाला, पोलिसांनी आंदोलकांच्या पाठीवर आणि डोक्यात मारायचे आणि आंदोलकांनी केवळ महिला पोलिसांच्या पायावर मारायचे? काय फडणवीस साहेब, कळता येईना परिस्थिती कशी झाली तिथे? अचानक मॉब आल्यानंतर जो गोंधळ उडाला आणि लाठीचार्जनंतर तो अधिकच उडत गेला, तेव्हा बेसावध असलेल्या महिला पोलिसांचे पाय तुडवले गेले, एखाद दुसरा दगडही आला. परंतु आंदोलनावर हल्ला हा आजचा प्रमुख विषय आहे. एवढे वर्ष आंदोलन सुरू असताना हे जे घडतय ना ते छत्रपतींना आणि छत्रपतींच्या खर्या मावळ्यांना पटणारे नक्कीच नाही.
त्यांनी पाप केले,
तुम्ही पापाचे भागीदार होऊ नका
आम्ही उभ्या महाराष्ट्रातल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना जाहीर विनंती करतो, सरकारने नक्कीच पाप केेले आहे, सरकारच्या या लाठीहल्ल्याला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराच्या म्हणजेच मतदानाच्या प्रक्रियेतून तुम्हाला उत्तर देता येईल. शिवाजी महाराजांचे तुम्हा-आम्हांवर संस्कार आहेत, महाराज नेहमी म्हणायचे, ‘आपल्या मावळ्यांना स्पष्ट आदेश द्यायचे, ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका,’ त्या आदेशाचे लोका हो तुम्हा-आम्हाला पालन करायचे आहे. वैयक्तिक मालमत्ता सोडा, शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही, शासनाच्या मालमत्तेचे नुकसान म्हणजे तुमचे-आमचे नुकसान आहे. आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करावयाचे आहे. तुम्ही हिंसक व्हाल, जाळपोळ कराल तर सरकारच्या पापाचे भागीदार व्हाल, हिंसक आंदोलनाने साध्य काहीच होणार नाही, उलट शिकल्या सवरलेल्या तरुण मावळ्यांचे भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे जे आंदोलन करायचे आहे ते शांततेच्या मार्गाने आणि सरकार मायबाप, शिवाजी महाराजांची शिकवण कघाणय होती, ते रयतेशी कसे वागायचे….‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.” शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे, स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा, ही उच्च कोटीची नैतिकता आहे. शिवाजीराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले. महिलांवर अन्याय करणार्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा केली अन् तुम्ही महिलांचे डोके फोडतात, त्यांना रक्तबंबाळ करतात. हा खरच शिवरायांचा महाराष्ट्र आहे का? खरचं तुम्ही शिवरायांच्या महाराष्ट्राचे रखवालदार आहात का? आत्मपरिक्षण करा आणि या आंदोलनाला हिंसक बनवणार्या त्या सडक्या मेंदुचा शोध घ्या.







