बीड (रिपोर्टर): थेटेगव्हण येथून आपल्या कुटुंबियासमवेत बीडकडे येत असलेल्या रिक्षाला कंटेनरने उडवल्याने झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा रात्री जागीच मृत्यू झाला होता. आज सकाळी त्यांच्या पार्थीवावर बीड शहरातील शहेंशाहवली कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. या वेळी साश्रू नयनांनी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. एका कँटेनरमुळे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांतून येत होत्या.
बीड शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे अजीम शेख हे आपली पत्नी व दोन मुलांसह थेटेगव्हण या आपल्या सासरवाडी येथे गेले होते. काल रात्री ते सासरवाडीवरून परत आपल्या गावी बीड शहराकडे येत असताना बक्करवाडी फाटा येथे भरधाव येणार्या कँटरने अजीम यांच्या रिक्षाला जोराची दडक दिली. या अपघातात नसरीन अजीम शेख या त्यांच्या पत्नी, नोमान अजीम शेख (वय 13 वर्षे) व अदनान अजीम शेख (वय 12 वर्षे) ही त्यांची दोन मुले जागीच ठार झाली. या घटनेची माहिती इस्लामपुरा भागात समजताच त्या ठिकाणी दु:खाचा डोंगर कोसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. आज सकाळी या तिघांवरही शहेंशाहवली कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.