रोख ठोक
गणेश सावंत
मो. 9422742810
बीड जिल्हा…! महाराष्ट्राच्या नकाशावरचा एक मागास जिल्हा….! परंतू विचाराने समृद्धशिल असलेला, आचरणाने बांधलेला अन् सर्वास पोटास लावणे आहे या ध्येय धोरणाने पछाडलेला. इथं साधु संतांच्या विचारांची पेरणी, इथं क्रांतीच्या मशालीला पाजले जातेय तेल, इथं सत्य आणि अहिंसेला दिलं जातं महत्त्व, अशा विचाराने समृद्ध असलेल्या बीड जिल्ह्यात जेव्हा जाळपोळीसारख्या घटना घडतात. थेट आमदारांच्या आणि माजी आमदाराच्या घराला आग लावली जातेय तेव्हा राज्याच्या राजकीय सारीपाटावर अनन्य साधारण महत्त्व असलेल्या बीड जिल्ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अवघ्या मराठवाड्याला मणिपूर कोणाला करायचंय? हा प्रश्न उपस्थित होतो. आमदारांचे घर जळत होते, संतप्त जमाव पेट्रोलचे बॉम्ब फेकत होते, रस्त्यावर टायर जाळत होते तेव्हा महाराष्ट्र गृहविभागाचे पोलीस हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून उघड्या डोळ्याने हे सर्व पाहत होती. हिंसाचार घडवणारा जमाव ज्या त्वेषाने आणि ज्या भावाने रस्त्यावर उतरला होता तो भाव आंदोलनाचा नक्कीच नव्हता. मग त्या हिंसाचार घडवणार्या जमावाचा भाव कुठला? हिंसाचार आणि जाळपोळ घडवण्यामागचा उद्देश कोणता? हे सर्व घटनाक्रम घडवण्यासाठी कोणाचे डोके चालले? जाळपोळीच्या घटनांना अंजाम देत कोण सत्तेची पोळी भाजू पाहतयं? कारण ही जाळपोळ 10 मिनिटांची नव्हती, अर्ध्या तासाची नव्हती, एक तासाची नव्हती तर तब्बल 8 ते 10 तास बीड आणि माजलगाव जळत होतं. जेव्हा 8 ते 10 तास हिंसाचार करणारे, जाळपोळीला अंजाम देणारे पोलिसांच्या छाताडावर नव्हे तर उरावर थया थया नाचत आग लावत असतात. तेव्हा त्या हिंसाचारामागचे डोके आणि हात शोधणे महत्त्वाचे असते.
जब कोई फसाद छे घंटे से जादा चलती है।
तो मानके चलिए, इसमे सरकारका हात है।
हे आमचे वाक्य नाही हे राजहंस नावाच्या लेखक असलेल्या सचिवांच्या लिखीत पुस्तकातलं वाक्य आहे. म्हणजेच एखादी दंगल, हिंसाचार अथवा जाळपोळ सहा घंट्यापेक्षा जास्त चालू असते तेव्हा त्या दंगलीत हिंसाचारात अथवा जाळपोळीत राज्य सरकार सहभागी असते असे या लेखकाचे म्हणणे आहे. मग बीडमध्ये जी जाळपोळ झाली, जो हिंसाचार झाला, जमावाने आमदार, लोकप्रतिनिधींचे जी घरे जाळली, जे कार्यालये जाळली त्यामागे सत्ताकारणाचं गणित आहे हे जेवढं त्रिवार सत्य आहे तेवढेच त्या घटनांना अंजाम देणार्या लोकांच्या पाठीवर हात ठेवणारे आणि डोक्यात विष कालवणारे कोण? हे समजणे आज घडीला अधिक महत्त्वाचे मानले जाईल. ज्या बीड शहरामध्ये गेल्या दोन दशकाच्या कालखंडात एक तर शेकण्यासाठी शेकोटी पेटवल्याचा धुर दिसत होता. अथवा दुरर्घटनेत जळालेली घटना दृष्टीक्षेपास पडत होती. मात्र वार सोमवार 31 ऑक्टोबरचा तो दिवस अवघं बीड पेटल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राला दाखवत होता. जो जमाव पुढार्यांच्या घरावर चालून गेला होता, त्या जमावातील
तरुणांच्या मस्तकात आग
अन् हातात पेट्रोल बॉम्ब
पाठीवर सॅग, पोटावर सॅग, त्या सॅगमध्ये ज्वालागृही पदार्थ, दगड, धोंडे अन् वार करावयास लागणारे सर्व साहित्य, सर्वसामान्य जेव्हा पाहत होते. तेव्हा जणू बीडवर अतिरेक्यांचा हल्ला झालाय का? असे चित्र उभे राहिले होते. आंदोलनाच्या पडद्याआड हे हिंसक आंदोलन करणारे स्वत:ला लपवत असले तरी घटना घडत होती त्याच दिवशी आंदोलनाचा आणि उभं बीड पेटवावयास निघालेल्या या जमावाचा दुर दुरचा संबंध नाही हे पोलिस ऑफ द रेकॉर्ड सांगत होते, सर्वसामान्य लोक सांगत होते, या हिंसाचाराच्या जमावात बघ्याची भुमिका घेणारे बघे सांगत होते, ज्यांच्यावर आपबिती घडली ते पुढारीही सांगत आहेत. म्हणून बीडमध्ये 31 तारखेला जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारात ज्या तरुणांचा वापर झाला ते कुणच्या जातीचे? धर्माचे? याचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या मस्तकात हिंसाचाराचा धर्म कोणी उतरवला. हे अधिक महत्त्वाचे आणि शोधण्याचे विषय म्हणावे लागतील. पोलिसांनी त्या दिवशी ज्या पद्धतीने बघ्याची भुमिका घेतली त्या भुमिकेतून बीडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा इथल्या नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला प्रश्न पडला होता. त्या दिवशी जे हिंसाचार करणारे जणू निधड्या छातीने आपण लोकांची घरं जाळतो म्हणजे आपले पितृ स्वर्गात जाणार या अर्विभावात ते वावरताना दिसून येत होते. ज्या घरांवर हे हल्ले झाले
त्या घरातील महिला, मुलांचे भयभीत चेहरे
आजही डोळ्यासमोर आले तर माणूस म्हणून हृदय हेलावून जाते. राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या क्षीरसागरांच्या बंगल्याकडे आजपर्यंत पाहितलं जात होतं. त्या बंगल्यात जो काही जाळपोळीचा आगडोंब उसळला तो आमदार, मंत्र्याचं घर जाळण्यापूरता मर्यादित नव्हता, त्या घरात दीपा क्षीरसागर असतील, आ.संदीप क्षीरसागरांच्या सौभाग्यवती नेहा क्षीरसागर असतील, योगेश क्षीरसागरांच्या सौभाग्यवती सारीका क्षीरसागर असतील त्यांचे लहान-लहान मुले असतील, हे तेव्हा घरात होते. बाहेर जमाव घोषणा देत होता, जळते टायर बंगल्यामध्ये फेकले जात होते. पेट्रोल बॉम्ब फेकले जात होते. डिझेल, केमिकल फेकले जात होते. तेव्हा घरातील या महिलांची आणि लहान मुलांची अवस्था काय असेल, सुदैवाने बीडच्या सुजान नागरीकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले, तिच परिस्थिती तिथे धैर्यशिल सोळंके यांच्या बंगल्यावर घडली. तिथेही जमावाने आग लावली, त्यांची सात महिन्याची पोटुशी(गरोदर) असलेली सून, त्यांचे नातवंड आणि मुलगा घरात होते. अख्खं घर जाळण्यात आलं, परिसरातील लोकांनी त्यांना कसंबसं बाहेर काढलं. याला आंदोलन म्हणायचं का? ही तर नशीड्या अफूगंजांची अतिरेकी वृत्ती. हा शिवबांचा महाराष्ट्र आहे, अशी वृत्ती इथे ठेचलीच जाईल. कारण
शिवबांच्या राज्यात महिलांचा आदर
हे उभ्या जगाला माहितीयं, मग ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुजून जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाला गालबोट लागावं अथवा त्या आंदोलनातील आंदोलकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशाणा कोण लावतयं? कारण 58 मोर्चे होतात, त्या मोर्चाची दखल अवघं जग घेतं, नंतर जे उपोषणं होतात, ज्या 50-50 लाख लोकांच्या जाहीर सभा होतात, त्याचीही नोंद आश्चर्यकारक पद्धतीने देशातला प्रत्येक व्यक्ती ठेवतो. मात्र तेथून पुढे आंदोलनाची तिव्रता जशीच वाढतेय तशी शिवरायांच्या विचारांवर चालणार्या या आंदोलनात हिंसाचार घडवणारी वृत्ती कुठून येतेय. ज्या राजाने भाजीच्या देठालाही हात न लावण्याचा सज्जड दम आपल्या मावळ्यांना दिला, ज्या शिवबांनी महिला, मुलांचा आदर एखाद्या धर्म ग्रंथाप्रमाणे केला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देत महिला मुलांना इजा होईल असे कृत्य शिवबांचे पायीक असणारे करतील काय? याचाच अर्थ कालची
जाळपोळ ही पुर्वप्लॅनिंग
होती. जाळपोळ करणारे कोडींगमध्ये बोलत होते. टिम करून विभागून बीडमध्ये नंगानाच करत होते. एक टिम बार्शी नाका, दुसरी टिम जालना रोड, आपत्कालीन टिम शहराच्या मध्यभागी, जाळपोळ करताना मुळूक, खांडे, मस्के, गोरे यांचे पक्ष कार्यालय तर राऊत, लोळगे यांचे दुकाने आणि सोळंके, क्षीरसागर यांचे घरे दिवसाढवळ्या जाळण्यात आले. इकडे अमरसिंह पंडितांच्या शिवछत्रावर जेव्हा हिंसाचार करणारे आले तेव्हा शिवछत्राच्या मावळ्यांनी शिवछत्राला कडे दिले, त्याचवेळी जाळपोळ करणारे 22 नंबरवर अडचण येतेय याची माहिती देत होते. कोडींगमध्ये बोलत होते, ते कोणाला माहिती देत होते, हे सर्व कोण चालवत होते? तरुणांच्या मस्तकामध्ये जाळपोळीचा केमिकल लोचा कोणी केला? हे जेवढे प्रश्न आहेत तेवढेच मराठा आंदोलनाच्या छाताडावर बसण्याइरादे मराठ्यांच्या खांद्यावरून सत्ताकारणाचं गणित जुळवण्यासाठी मराठवाड्याचं मणिपूर कोण करतयं? हा आमचा सवाल अन् याचं उत्तर मराठ्यांसह बीड जिल्ह्याच्या सुजान नागरीकांनी शोधावं! अन् त्या नतदृष्टांचे मनसुबे उधळावेत.