Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईआ.लक्ष्मण पवारांचे आंदोलन दलालांसाठी की निराधारांसाठी ? संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष...

आ.लक्ष्मण पवारांचे आंदोलन दलालांसाठी की निराधारांसाठी ? संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा सवाल


गेवराई, दि.4 (प्रतिनिधी) ः- आ.लक्ष्मण पवार यांनी स्वतःच्या हाताने मंजुरीपत्र वाटप केलेल्या 11 हजार 347 निराधारांना अद्याप अनुदान का मिळाले नाही ? याचे उत्तर आमदार महोदयांनी दिले पाहिजे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असतानाही निराधारांना अनुदान वाटपासाठी कोणी अडवले होते ? निवडणुका जवळ आल्या की आमदारांना निराधारांची आठवण झाली, दलालांनी घेतलेल्या पैशाची विचारणा गावागावात निराधार करत आहेत. भाजपच्या दलालांना तोंड दाखवण्याची सोय राहिली नाही, निवडणुकीच्या तोंडावर आमदार महोदयांचे आंदोलन या दलालांसाठी की निराधारांसाठी? असा सवाल संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले व सदस्य ज्ञानेश्‍वर नवले यांनी केला आहे.

सन 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखालील निराधार समितीची केवळ एक बैठक दि.31 जुलै 2018 रोजी झाली. या बैठकीत एकाच वेळी 11 हजार 347 निराधारांना अनुदान मंजुर केल्याचे दाखवून त्याचा गाजावाजा केला. तहसिल कार्यालयात बोलवून गोरगरीब, अपंग, विधवा निराधारांना मंजुरीचे पत्र दिले, मात्र अद्याप या निराधारांना अनुदान मिळाले नाही. या अकरा हजार निराधारांची फसवणुक खुद्द आमदार महोदयांनीच केली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर निराधारांचा पुळका दाखवत आंदोलनाचे नाटक ते करत आहेत. तहसिल कार्यालयातील एका कक्षात अतिक्रमण करून खाजगी कार्यालयातून केलेल्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराचा फटका निराधारांना बसला. एका-एका मंजुरी पत्रासाठी तीन ते पाच हजार रुपयांची दलाली घेणार्यांना गावागावातील निराधार सवाल विचारत आहेत. ज्यांचे प्रस्तावही तहसिलमध्ये दाखल नव्हते त्यांना तुम्ही बोगस मंजुरीपत्र कसे दिले ? असा जाहिर सवाल गेवराई तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले व सदस्य ज्ञानेश्‍वर नवले यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमची समिती अस्तित्वात येवून एका वर्षाचा कार्यकाळ झाला आहे. एक वर्षात आम्ही तीन बैठका घेवून हजारो निराधारांचे प्रस्ताव मंजुर केले, मंजुर केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानही मिळाले, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली खर्या लाभार्थ्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. दलालांच्या माध्यमातून गोरगरीबांची आर्थिक पिळवणुक करणार्यांना आमच्या नेत्यांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या आंदोलनाच्या नौटंकीला लोक भिक घालणार नाहीत असा टोलाही शेवटी निराधार समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले व सदस्य ज्ञानेश्‍वर नवले यांनी लगावला.

Most Popular

error: Content is protected !!