रिपोर्टर परिवाराने केला डॉ. खान यांचा हृदयसत्कार
कन्याकुमारी ते काश्मिर झाला 7 हजार कि.मी.चा प्रवास रोज किमान 600 ते 800 कि.मी.चे कापले जात होते अंतर
बीड (रिपोर्टर)- येथील ग्लोबल चाईल्ड हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ तथा हौशी बाईकरायडर आणि बॉडी बिल्डर म्हणून ओळख असलेले डॉ. ईलियास खान यांनी आपली मोटारसायकल कावासाकी निंजा 800 वरून अवघ्या 12 दिवसात 7 हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते काश्मिर ही भारतभ्रमण करण्याचा विक्रम त्यांनी केला. काल ते बीड शहरात डेरेदाखल झाले तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आज सायं. दैनिक बीड रिपोर्टर कार्यालयातही त्यांचा संपादक शेख तय्यब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अत्यंत कमी दिवसात 7 हजार कि.मी.चा प्रवास करत भारतभ्रमण करणारे बाईकरायडर म्हणून त्यांच्याकडे पाहितलं जातं. या प्रवासात त्यांनी कमीत कमी 600 आणि जास्तीत जास्त 800 कि.मी. चा पल्ला रोज मोटारसायकलवर कापल्याचे त्यांनी सांगितले. या आधी त्यांनी 2016 साली दोन रात्र आणि एका दिवसात म्हणजेच 30 तासात 2500 कि.मी.चा प्रवास केला होता. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.30 वाजता बीड येथून ते प्रवासासाठी निघाले. कन्याकुमारी ते काश्मिर असा प्रवास त्यांना करायचा होता. कोरोनाच्या भीतीने एकीकडे लोक घरबंद आहेत. बाहेर पडायला घाबरतात अशा परिस्थितीत डॉ.ईलियास खान हे भारतभ्रमण करण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत परळीचे डॉक्टर पिंगळेही होते. बीड येथील ग्लोबल चाईल्ड हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर, हौसी बाईकरायडर तथा बॉडी बिल्डर म्हणून ओळख असलेले ईलियास खान हे आपल्या कावासाकी निंजा 800 या बाईकवरून अवघा देश पादाक्रांत करण्याचे आव्हान स्वीकारत ते प्रवासासाठी निघाले. रोज कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 800 कि.मी.चा ते प्रवास करायचे. 18 तारखेला बीड येथून सोलापूर, बेंगळूर, कन्याकुमारी परत बेंगळुरू, हैद्राबाद, नागपूर, हैद्राबाद, ग्वाल्हेर, चंदीगड, मनाली, रोहतंग, अटल टनेल परत चंदीगड, जयपूर, इंदोर, धुळे, औरंगाबाद आणि बीड असा प्रवास त्यांनी केला. या बारा दिवसांमध्ये त्यांना अनेक चांगले अनुभव आले. डॉ. इलियास खान हे बीड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि बॉडी बिल्डर म्हणून चांगले परिचीत आहेत. बारा दिवसात भारतभ्रमण केल्यानंतर ते बीडमध्ये आल्यानंतर त्यांचे मित्र कंपनीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज सायं.दैनिक बीड रिपोर्टर कार्यालयात त्यांचा संपादक शेख तय्यब, कार्यकारी संपादक गणेश सावंत, रफिक कुरेशी, परवेज देशमुख, बरकत पठाण, सय्यद सोनु, सचिन संचेती, समीर तांबोळी, फहाद शेख व वसीम बेग यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी प्रवासात आलेले अनेक अनुभव त्यांनी सांगितले.