साक्षाळपिंप्री (रिपोर्टर): सकारात्मक बैठका खूप झाल्या, पण मराठ्यांच्या पदरात काय पडलं?आजही नोंदी सापडून मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात येत नाही. जेव्हा समाजाच्या पदरात पडल तेव्हा अशा बैठकांना महत्व प्राप्त होईल. 20 जानेवारीपर्यंत सरकारला दारे खुले आहेत. नंतर एकदा सराटी अंतरवलीतून बाहेर पडलो तर आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही. काही जण नोंदी रद्द करा म्हणतात, शासकीय नोंदी सापडल्या असतील तर त्या कायदेशीर आहेत. रद्द होत नसतात. आणि या नोंदी रद्द झाल्यातर ओबीसींचं आरक्षण पंधरा मिनिटात रद्द होईल, असं म्हणत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ना. छगन भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली.
जरांगे पाटील यांनी आज बीड तालुक्यातल्या साक्षाळपिंप्री येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. तेव्हा उपस्थितांंना त्यांनी मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. मराठे लढाई जिंकत आले आहेत. खरंतर मुंबईला जाणार नव्हतो मात्र ती वेळ सरकारने आणली. काल बैठक झाली, एका-एका वाक्यावर एक-एक तास चर्चा झाली. पाच मॅराथॉन बैठका एका दिवसात मराठा आरक्षणासाठी झाल्या. अशा बैठका खूप होतात. परंतु मराठ्यांच्या पदरात काय पडले? मला मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर वर्दी पहायची आहे. त्यामुळे मी त्यांना दोन मागण्या केल्या होत्या, ज्यांची नोंद सापडेल, त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावे मात्र ही मागरी सरकारकडून पुर्ण होत नाही. आता 20 जानेवारीची तयारी अंतिम टप्प्यात असून बैठका, चर्चा होत राहतील, परंतु जेव्हा मराठ्यांच्या पदरात पडेल तेव्हाच मी मागे हटेल. महाराष्ट्रातील मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. नागपूर अटीसह महाराष्ट्रात समावीष्ट झाले मात्र मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाले आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यानुसार मराठ्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे. काही जण म्हणतात खोट्या नोंदी रद्द करा, अरे या सरकारी नोंदी आहेत, त्या रद्द होत नसतात आणि या नोंदी रद्द झाल्या तर ओबीसींचं आरक्षण पंधरा मिनिटात रद्द होईल, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.











