अवैध गर्भपात प्रकरणात जामीनवर असलेल्या मनिषा सानप सह तिच्या सहकार्यांनी खासगी घरात सुरू केला होता गर्भपाताचा धंदा
गेवराई (रिपोर्टर): अवैध गर्भपात प्रकरणात जामीनवर असलेल्या आरोपींकडून पुन्हा अवैध गर्भपाताचा धंदा सुरू केल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यनंतर आज सकाळी बनावट ग्राहक पाठवून अवैध गर्भपात करणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आरोग्य प्रशासनासह गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. गेवराई शहरातल्या संभाजीनगर परिसरातील एका किरायच्या घरामध्ये गर्भातच मुली मारण्याचा धंदा यांनी उघडला होता. या प्रकरणात जामीनवर असलेली मनिषा सानप हिच्यासह चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर यातील डॉक्टर घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या खळबळजनक घटनेची अधिक माहिती अशी की, गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी गेवराई शहरामध्ये अवैध गर्भपात केल्या प्रकरणी मनिषा सानप या महिलेसह अन्य आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण राज्य पातळीवर गाजले होते. मनिषा सानप हिस जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तिने एका डॉक्टराच्या मदतीने अवैध गर्भपाताचा धंदा थाटल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षकांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार ज्या खासगी घरामध्ये हा गोरख धंदा सुरू होता त्याठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत बनावट ग्राहक महिला तयार करून ती गर्भपातासाठी त्याठिकाणी पाठवण्यात आली. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आरोग्य विभागासह गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या घरावर छापा मारला. त्यावेळी मनिषा सानप, घरमालक व त्यांना मदत करणारे अन्य दोन लोक त्याठिकाणी मिळून आले. या झटापटी दरम्यान डॉक्टर घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान घटनास्थळी सोनोग्राफी मशिन, गर्भपात करणारे सर्व साहित्य मिळून आले. या प्रकरणातील आरोपी महिला मनिषा सानप व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, वैद्यकीय अधिक्षक मोहम्मद नुमानी, डॉ. रांदड, डॉ. राजेश शिंठदे, एपीआय धस मॅडम, पीएसआय मोरे, वाळके, बहिरवाल, एस.एम. राऊत, मुळे, खरमाटे, ढाकणे, सोनवणे, गोरे, चाटे, नेवडे यांनी केली.











