आष्टी तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या दाम्पत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
ओटी (रिपोर्टर): आई कामात व्यसस्त असताना घराच्या बाजुला खेळणार्या दीड वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे घडली. कानिफनाथ शिवाजी मिरास असे या दीड वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वडाळी येथील शिवाजी मिरास हे पत्नी व दीड वर्षाच्या मुलासह तीन महिन्यापासून अंबालिका सहकारी साखर कारखाना राशीन या ठिकाणी ऊसतोडणी करत आहेत. हे मजूर दाम्पत्य लेकरा-बाळांसह आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील थेटे वस्तीवर झोपड्या टाकून राहत आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे उसाच्या फडात जाण्यासाठी कामाची आवराआवर करत होते. या वेळी दीड वर्षाचा कानिफनाथ आईशेजारी खेळत होता. दरम्यान खेळता खेळता अचानक तोल गेल्याने कानिफनाथ पाण्याच्या बादलीत बुडाला. काम आवरल्यानंतर आई मुलाला शोधत असताना तिला कानिफनाथाचा मृतदेह बादलीत औळून आला. चिमुकल्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.












