बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर काही समाजकंटकांनी मराठा समाजाविरोधात घोषणाबाजी करत फाडले. या प्रकरणी तक्रार देऊनही आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केल जात नाही, त्यांना अटक केली जात नाही. यामुळे आज पिंपळगाव, मांजरा येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आरोपींना दोन दिवसात अटक करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

दोन फेबु्रवारी रोजी बीड -पिंपळनेर रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव मांजरा येथील गावकर्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक बॅनर लावले होते. सदरचे बॅनर 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही समाजकंटकांनी तोफा वाजवत जातीवाचक घोषणा देत ते फाडले. या प्रकरणी गावकर्यांनी पिंपळनेर पोलिसामध्ये तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून कुठलीच ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून आज गावकर्यांनी बीड-पिंपळनेर रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांनी घटनास्थळी येत आज संध्याकाळपर्यंत दोषींवर कारवाई करत अटक करर्याचे आश्वासन दिले. तरीही आणखी दोन दिवस त्यांनी वेळ मागून घेतला. सरशेवटी आंदोलकांनी पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.












