यंत्रणा आणि यंत्राच्या अभावी रुग्ण मृत्यूच्या दाढेत
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी साधे डिफिब्रिलेट नाही
बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर आणि सुसज्जतेवर एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून येत आहे. केवळ इमरजन्सीत तात्काळ यंत्रणेअभावी उपचार मिळत नसल्याने लोकांचे मृत्यू होत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. काल पोलीस कॉन्स्टेबल शेख अन्वर यांना हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यावेळी इमरजन्सीमध्ये त्यांना डिफ्रीलेट करणे गरजेचे होते, परंतु जिल्हा रुग्णालयात डिफिब्रिलेट करण्यासाठी जे यंत्र लागते तेच त्या ठिकाणी नव्हते. त्याचबरोबर एक वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांना ज्या वेंटीलेटरची आवश्यकता असते ते वेंटीलेटर त्या ठिकाणी नसून जिल्हा शल्यचिकित्सक हे नावाने बडे आणि बडेजावाची भाषा करत असले तरी रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी उपचारांची कमतरता भासत आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बडे यांनी चार्ज घेतल्यापासून रुग्णालय राम भरोसे चालू आहे. लोक जीवन मरणाचा खेळ रोज त्याठिकाणी खेळत आहेत. धडधाकट रुग्ण केवळ रुग्णालयाच्या अकार्यक्षमतेमुळे मृत्यूच्या दाढेत जात आहेत. तर काही थेट सरणावर गेले आहेत. ते केवळ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कुचकामी धोरण आणि यंत्रणेमुळे एकीकडे जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर इमारती बांधल्या जात आहेत. सुसज्जपणाचा देखावा निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र माणसांच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो तेव्हा रुग्णालयात यंत्रसामग्रीच नसते. त्याचा अनुभव काल आला. पोलीस कॉन्स्टेबल शेख अन्वर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते स्वत:हून रुग्णालयात आले. त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याक्षणी त्यांना तात्काळ डिफिब्रिलेट करणे अत्यावश्यक होते. मात्र डिफिब्रिलेटसाठी म्हणजेच शॉक देण्यासाठी रुग्णालयामध्ये यंत्रणा नव्हती हे दुर्दैव. शेख अन्वर यांना तात्काळ डिफिब्रीलेट केले असते तर कदाचित आज त्यांचा जीव वाचला असता मात्र जिल्हा शल्यचिकित्सक बडेंच्या नुसत्या बडेजावपणात रुग्णालयात रुग्ण जीव मुठीत धरून उपचार घेत आहेत. या रुग्णालयामध्ये एक वर्षापेक्षा पुढच्या मुलांना ज्या वेंटीलेटरची गरज असते ते वेंटीलेटरही त्याठिकाणी नसल्याचे सांगण्यात येते. सिटीस्कॅन यासह अत्यावश्यक मशिनी बंद असतात. त्यामुळे बीडचे जिल्हा रुग्णालय वरुण सुसज्ज असले तरी उपचार आणि यंत्राअभावी साक्षात मसनवाटा तर नव्हे अशी संतप्त प्रतिक्रिया आता रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.