अंबाजोगाई (रिपोर्टर): हॉटेल मालक मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना समोरून आलेल्या गाडीने कट मारल्यामुळे हॉटेल चालकाची मोटारसायकल स्लिप झाली आण तो रस्त्याच्या कडेला पडला. त्यावेळी जखमी अवस्थेत बेशुद्ध झालेल्या मोटारसायकल चालकास मदत करण्याऐवजी अज्ञात चोरट्याने त्या जखमी मोटारसायकल चालकाचा मोबाईल आणि मोटारसायकल चोरून नेल्याची दुर्दैवी घटना वाघाळा रोडवरच्या पुलाजवळ जोगाईवाडी शिवारात घडली. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी येथील हॉटेल चालक महेश नवनाथ सुकडे हे अंबाजोगाई येथून गावाकडे मोटारसायकलवर निघाले होते. त्यांची मोटारसायकल जोगाईवाडी शिवारातील वाघाळा रोडवरच्या पुलाजवळ आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी गाडीने त्यांना कट मारला. त्यामुळे त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला अणि गाडी स्लिप होऊन अपघात घडला. या अपघातात महेश सुकडे हे रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडले. त्यावेळी त्यांना मदत करण्याऐवजी अज्ञात चोरट्याने तिथे पडलेला सुकडे यांचा मोबाईल आणि टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी मोटारसायकल क्र. एम.एच. 24 वाय 5162 ही गाडी चोरून नेली. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.