नवलेही पवारांच्या संपर्कात
नवलेंना शासन-प्रशासनाचा अनुभव
राजकारण-समाजकारणामध्ये आघाडीवर
नवलेंच्या आकस्मात नावाने लोकसभेला आत्ताच रंग
बीड (रिपोर्टर): शरद पवारांकडून बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण येतो, मेटे की सोनवणे यावर गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून अडगळी चालू असल्या तरी उमेदवाराबाबत शरद पवार पोटातलं पाणी हळू देत नसल्याचे दिसून येते. यातच शरद पवारांनी आता बीड लोकभेसाठी मोठी गुगली फेकण्याची तयारी दाखवल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. त्यानुसार शरद पवार हे माजी मंत्री सुरेश नवले यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आग्रही असल्याचे सांगण्यात येत असून सुरेश नवलेही शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. नवले हे अभ्यासू व्यक्तिमत्वासह प्रभावशाली वक्ते असून त्यांना राजकारण, समाजकारण आणि शासन-प्रशासन व्यवस्थेतला मोठा अनुभव आहे. त्यामुळेच शरद पवार आता बीड लोकसभेसाठी हा नवा चेहरा त्यांच्याकडून देण्याबाबत चाचपणी करत आहेत.
माजी मंत्री सुरेश नवले यांना शासन-प्रशासन व्यवस्थेतला प्रदिर्घ अनुभव आहे. राजकारण, समाजकारण यावर त्यांचा अभ्यासच नव्हे तर त्यावर त्यांची चांगली पकड आहे. प्रभावशाी वक्तृत्वामुळे ते आपली भूमिका आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे लोकांसमोर मांडू शकतात यासह शासन-प्रशासनातल्या अनुभवातून लोकसभा निवडणुकीसाठी ते भारदस्त उमेदवार ठरू शकतात. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि सुरेश नवले यांच्यात गुफ्तगू सुरू असल्याचे सांगितले जाते. बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषीत झाली आहे. त्यानंतर शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे या शरद पवारांच्या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा होत होती. पुढे बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांचा गट सोडून शरद पवारांचा काफिला गाठला त्यामुळे मेटे की सोनवणे ? या वर चर्चा सुरू झाली, मात्र पंकजा मुंडे या भारदस्त उमेदवाराला तोडीस तोड उमेदवार देण्या हेतू शरद पवारांच्या चाचपण्या सुरुच आहेत. त्यात आता माजी मंत्री नवलेंचं नाव समोर येत आहे. नवलेही निवडणूक लढविण्याबाबत इच्छूक असून ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते तर पवारही सुरेश नवलेंच्या नावाबाबत विचारविनीमय करत बीड जिल्ह्यातून प्रतिक्रिया मागवत असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. एकूणच नवले हे शरद पवारांचे उमेदवार झाले तर बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध नवले ही वेगळी फाईट महाराष्ट्राला चित्तथरारकपणे पहायला मिळेल.