केज तालुक्यातील पावनधाममध्ये घडली घटना
पोलीस संरक्षणात पंकजांची गाडी गावाबाहेर
केज (रिपोर्टर): मराठा समाजाच्या रोषाला भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा आज सामोरे जावे लागले. केज तालुक्यातील पावनधाम येथील अखंड हरिनाम सप्ताहास भेट देण्यासाठी त्या गेल्या असता त्याठिकाणी त्यांची गाडी अडवत मराठा समाजातील तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या दरम्यान पोलिसांनी त्याठिकाणी सौम्य लाठीमार केला. या घटनेनंतर पंकजा मुंडेंना घटनास्थळावरून माघारी परतावे लागले. त्या आज केज तालुक्यात प्रचार दौर्यावर आहेत. आज सकाळी पोलिसांनी काही मराठा तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे सकाळपासूनच पावनधाम आणि औरंगपूर परिसरात मराठा समाज संतप्त होता. काही काळ या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक असे की, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे आज केज तालुक्यामध्ये प्रचार दौर्यावर आहेत. तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे त्याठिकाणी भेटीसाठी येणार याची माहिती मराठा समाजाला झाली होती. त्यातील काही तरुणांनी व्हिडिओद्वारे इशारे दिल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार सकाळी यूसुफवडगाव पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले होते. सदरच्या पोलिस कारवाईने सकाळपासूनच त्या भागातील मराठा समाज संतप्त होता. आज दुपारी पंकजा मुंडे आपल्या ताफ्यासह पावनधाम येथे आल्या मात्र त्याठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजातील तरुणांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. पंकजा मुंडे यांची गाडी अडवत मोठी घोषणाबाजी झाली. या वेळी उपस्थित पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्यास सुरुवात केल्याने पावनधाममध्ये पळापळ झाली आणि मोठा गोंधळ उडाला. त्याठिकाणावरून पंकजा मुंडे यांना पोलीस संरक्षणात गावाबाहेर यावे लागले. याआधाही पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आजच्या या घटनेत पोलिसांनी काही तरुणांची धरपकड केली आहे.