निगरगट्ट ग्रामसेवकाला दहा महिन्यांपासून माहिती देता येईना
बीड (रिपोर्टर): ग्रामपंचायतमध्ये निधी किती शिल्लक आहे? किती निधी आला? घरपट्टी किती वसूल झाली? यासह अन्य बाबींची माहिती गेल्या दहा महिन्यांपूर्वी माहिती अधिकारा अंतर्गत मागवूनही ईटकूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने अद्याप माहिती दिली नाही. कर्तव्यात कसूर म्हणून जिल्हाधिकार्यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक असे की, ईटकूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला 13 जून 2023 रोजी माहिती अधिकाराअतंर्गत ग्रामपंचायतच्या खात्यावर किती निधी शिल्लक होता? त्याचबरोबर 21-6-2021 ते 21-6-2023 पर्यंत घरपट्टी किती वसूल करण्यात आली? त्याचबरोबर 21-6-2021 ते 12-6-2023 या कालावधीत शासन निधी किती आला? व तो ग्रामपंचायत आराखड्यानुसार कोण कोणत्या कामात खर्च केला? याबाबतची माहिती गणेश ढेंगळे यांनी गेल्या दहा महिन्यांपूर्वी माहिती अधिकारामध्ये मागितली मात्र आज पावेतही संबंधित ग्रामसेवकाने ती माहिती दिली नाही. एकीकडे शासन-प्रशासन पारदर्शकपणाचा डांगोरा पिटवतो मात्र दुसरीकडे प्रशासनातील गावपातळीवरील कर्मचारी-अधिकारी शासनाच्या त्या पारदर्शकपणाला हरताळ फासत आहेत. दहा महिन्यांपासून माहिती अधिकारा अंतर्गत माहिती न पुरविणार्या ईटकूर ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.