बीड (रिपोर्टर): वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या विषयी सोशल मिडियाच्या माध्यमातून काही जण बदनामी करत असल्याने संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देऊन जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली. त्यानुसार बीड सायबर पोलिसांकडून सोशल मिडियाची छानणी केली जात असून हिेंंगेंची बदनामी करणार्यांवर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन वंचीतचे उमेदवार अशोक हिंगे यांची सोशल मिडियामधून बदनामी केली जात असल्याचे सांगितले. जे कोणी वंचीतच्या उमेदवाराची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करत आहेत, व्हिडिओ टाकून तो फॉरवर्ड करत आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांकडून सोशल मिडियावर व्हिडिओ टाकणार्या आणि फॉरवर्ड करणार्यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत असून प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे निवेदन देऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वंचीतच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट ज्ञानेश्वर कवठेकर, अजय सरवदे, शेख युनुस, विशाल बोबडे, राजेशकुमार जोगदंड, अनिताताई चक्रे, पुष्पाताई तुरुकमारे यांनी घेतली.










