माजलगाव/बीड (रिपोर्टर) शिवसेना घराघरात पोहचविण्या हेतू पक्षाने शिवसंपर्क अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानात पक्ष निरीक्षक जिल्ह्या जिल्ह्यात पाठवून तेथील शिवसैनिकांसह पदाधिकार्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट असताना चंदन शिंगरे या पक्षनिरीक्षकाने मात्र परळी, अंबाजोगाई, माजलगाव विधानसभा मतदारसंघात आजी-माजी कार्यकर्त्यात वाद लावल्याच्या तक्रारी समोर येत असून शिंगरे यांच्यामुळे परळीत शिवसेनेच्या दोन गटात मारामारीही झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी माजलगावमध्ये पदाधिकार्यांशी बोलणे, त्यांचे काम होते मात्र पदाधिकार्यांसोबत न बोलताच शिंगरे हे निघून गेेले. यामुळे शिवसेनेसह पदाधिकार्यात नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्या जिल्ह्यात शिवसेना घराघरात जावी या उद्देशाने पक्षाने शिवसंपर्क अभियानास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात एका खासदारासह मुंबईहून चार निरीक्षकांना बीड जिल्ह्यात शिवसेना पदाधिकार्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत पक्षाची भूमिका आणि ध्येय धोरणे, शिवसेनाप्रमुखांचे विचार घराघरात पोहचणे हा उद्देश असताना मुंबईहून आलेले निरीक्षक विजय देशमुख, भंडारी, विलास राणे, चंदन शिंगरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांशी संवाद साधणे अपेक्षित होते. देशमुख, राणे, भंडारी यांनी आपले काम यथोचीत पार पाडले. खा. निंबाळकरांच्या कार्यक्रमातही उपस्थित राहिले, मात्र चंदन शिंगरे यांनी परळी, माजलगाव, केज मतदारसंघातील तालुक्या तालुक्यात जावून आजी-माजी पदाधिकार्यात वाद लावल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शिवसैनिकांचे अथवा पदाधिकार्यांचे म्हणणे, तक्रारी अथवा अडीअडचणी समजून घेण्यापेक्षा शिनगारे यांनी वाद लावल्याचे बोलले जाते. त्यातून परळीत काल शिवसेनेच्या दोन गटात हमरातुमरी होत मारामारी झाल्याचेही सांगण्यात येते. आज सकाळी माजलगावात शिवसैनिकांशी संवाद साधून पदाधिकार्यांशी बैठक घेणे महत्वाचे होते, मात्र शिंगरे हे शिवसैनिक अथवा पदाधिकार्यांशी न बोलता निघून गेल्याने शिवसैनिकांसह पदाधिकार्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.