Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईममंडळ अधिकारी, तलाठ्याने अवैध वाळुचा ट्रॅक्टर पकडला, वाळू माफियांनी अधिकार्‍यांना धक्काबुक्की करून...

मंडळ अधिकारी, तलाठ्याने अवैध वाळुचा ट्रॅक्टर पकडला, वाळू माफियांनी अधिकार्‍यांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळविला


बीड (रिपोर्टर) अवैध वाळुचा उपसा करून ती वाळू ट्रॅक्टरमध्ये भरत असताना महसूलच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून ट्रॅक्टर पकडला. तो पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या वाळु माफियांनी मंडळ अधिकार्‍यांसह तलाठ्यांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टरचे हेड आणि मंडळ अधिकार्‍यांचा मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना माजलगावात घडली. या प्रकरणी वाळु माफियांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव येथील किट्टीआडगावचे तलाठी प्रवीण शिंदे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 24 मार्च रोजी ते अवैध वाळुवर कारवाई करण्यासाठी ते तहसीलदार यांनी नेमलेल्या पथकासोबत मंडळ अधिकारी के.सी. पुराणिक आणि इतर तलाठी हे नदीपात्रात गेले असता गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसून ती वाळू मजुराच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरत असताना त्यांनी एक ट्रॅक्टर रिधोरी गावात पकडला. तो ट्रॅक्टर घेऊन ते पुढील कारवाईसाठी माजलगाव पोलीस ठाण्याकडे जात असताना सुर्डीजवळ दुचाकीवरून आलेल्या लक्ष्मण कदम, बबलू तौरे, रामा कदम, श्याम तौर, आकाश पट्टेकर व भगत तौर यांनी मंडळ अधिकारी यांच्या गाडीला मोटारसायकली आडवल्या लावून मंडळ अधिकारी यांना धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला व ट्रॅक्टरचे हेड घेऊन पळ काढला. महसूलच्या अधिकार्‍यांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावली. या प्रकरणी वरील आरोपींविरोधात तलाठी प्रवीण शिंदे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जोनवाल हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!