गणेश सावंत –
महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या भल्याबुर्या घटनांचा केंद्रबिंदू असलेल्या बीड जिल्ह्यात काल अठराव्या लोकसभेसाठी मतदान झाले. पंकजा गोपीनाथ मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी थेट लढत पहायला मिळाली. ही लढत दोन विचारसरणीची होती? विकासाची होती? जातची होती? की अन्य कुठल्या मुद्यावर लढली गेली? यावर चर्चा होत असतानाच महाराष्ट्रात कुठेही मतदान झाल नाही तेवढे मतदान बीड जिल्ह्यात झाल्याने हा मताचा टक्का नेमका कोणाच्या पदरात पडतो? यावर चर्चा आणि कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघांची कार्यकर्ते, समर्थकांनी वाटणीही करून टाकली. गेवराई, बीड, माजलगाव सोनवणेंचा बालेकिल्ला सांगितला जाऊ लागला तर आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघावर पंकजा मुंडेंचा दबदबा असल्याचे सांगितले जाऊ लागले. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी कुणाला कौल दिला? हे सांगणे मताचा टक्का वाढल्याने अनिश्चिततेचे वाटू लागले त्यातच उत्सुकताही उभ्या महाराष्ट्राला लागून राहिली. वाढलेल्या मताचा टक्का हे कोणासाठी रिअॅक्शन होतेआणि कुणाविरुद्ध अॅक्शन होते, हे मतदान यंत्र खुलल्यानंतर समोर येणार असले तरी दोघांच्या समर्थकांकडूएन ‘बीड जिल्हा आपलाच बालेकिल्ला’ याचा बोलबाला पहायला मिळत आहे.

काल झालेल्या मताच्या टक्क्याकडे कटाक्ष टाकताना विजयाची आजमितीला कोणाच्या गळ्यात पडेल हे सांगणे अत्यंत धाडसाचे होईल. परंतु वाढलेला मताचा टक्का आणि गेल्या 20 दिवसांच्या कालखंडात उडालेल्या प्रचाराच्या धुराळ्यातून अंदाज धुंडताना ही निवडणूक बीडच्या लोकप्रतिनिधींना व राज्य आणि देशाच्या कारभार्यांना डोळ्यात झणझणीत अंजन घालून सोडणारी म्हणावी लागेल. एकीकडे भारतीय जनता पार्टी 400 पारचा नारा देत होती, मात्र देशात जसे जसे मताचे टप्पे पार केले जात होते तसे तसे सुरुवातीला भाजपाने दिलेले नारे मागे पडत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जिथे तिथे वेगवेगळे मुद्दे प्रचाराचे मुख्य केंद्रबिंदू बनले असले तरी या वेळेस प्रामुख्याने मराठा आरक्षण हा एक सत्ताधार्यांसाठी कळीचा मुद्दा बनला आणि हाच कळीचा मुद्दा बीड लोकसभेसाठी अधिक आक्रमक ठरला. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी भाजपाबरोबर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अख्खी फलटन होती. दस्तुरखुद्द राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजांची यंत्रणा आपल्या हाती घेतली होती. त्यामुळे पंकजा मुंडेंचा विजय कोणीच रोखू शकणार नाही, असे राज्यभरातून स्पष्टपणे सांगितले जात होते. परंतु जेव्हा प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली अन् ही निवडणूक थेट जातीवर जाऊन पोहचली तेव्हा मात्र पंकजांना ही निवडणूक अधिक कठीण बनत गेली. तर बजरंग यांची प्रयत्नविना चर्चा होत राहिली. पंकजांना अनेक ठिकाणी अडवण्यात आले, तसे ओबीसीचे एकीकरणही होत गेले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबाजोगाईत झालेली सभा आणि त्यांनी मुस्लिमांबाबत गेलेले भाष्य पंकजांना पुन्हा अडचणीत आणून गेले. तर तिकडे देवेंद्र फडणविसांनी धसांच्या उमेदवारीची केलेली घोषणा पंकजांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीला अस्वस्थ करून सोडणारी ठरली. परंतु धनंजय मुंडे यांनी थेट आपल्या बहिणीसाठी मते मागितल्याने फडणविसांची घोषणा तेवढी प्रभावी ठरली नाही. या कालावधीमध्ये मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या सभा या निवडणुकीमध्ये अधिकच प्रभावी ठरून गेल्या. जरांगेंनी कोणाला विजयी करा, हे म्हटले नसले तरी मराठा आरक्षणाला विरोध करणार्याला मोठ्या मताधिक्याने पाडा, ही भूमिका घेतली. गेवराई तालुका हा गोदा पट्ट्यात येतो आणि त्या ठिकाणीच जरांगेंचा अधिक प्रभाव पहायला मिळाला त्यापाठोपाठ बीड विधानसभा मतदारसंघ आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघात मराठा-मुस्लिम यांनी मोठ्या प्रमाणावर बजरंग सोनवणेंच्या पाठिशी उभा राहणे पसंत केले. त्यात अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके या दोन नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराकडे मते वळवण्याचे प्रयत्न केले खरे परंतु त्यांना यश येईल का? यावर शंकाच. तर इकडे आष्टीत भाजपाचे सुरेश धस, भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आजबे हे एकत्रित पंकजांसाठी काम करताना दिसून आले. त्यामुळे आष्टी मतदारसंघात मताचा टक्का हा पंच्याहत्तरवर गेला. इकडे केज विधानसभा मतदारसंघ बजरंग सोनवणेंचा होम पीच तर तिकडे परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा व धनंजय मुंडेंचा होमपीच त्यामुळे त्याठिकाणीही सत्तर ते एकाहत्तर टक्के मतदान झालेले आहे. अशा स्थितीत मुंडे की सोनवणे? यावर चर्चा जिल्हाभरात हाते आहे. आपण परळी, गेवराई, माजलगाव हे बजरंग सोनवणेंसाठी झुकते माप देणारे मतदारसंघ ठरवले तर आष्टी, परळी, केज हे तीन मतदारसंघ पंकजा मुंडेंसाठी समर्पक मानले जातात. त्यावर चर्चा होते. परंतु महत्वाचे, ही निवडणूक ना पंकजा मुंडे ना सोनवणे यांची होती, ना पक्षाची होती, तर ही निवडणूक मराठा-मुस्लिम-वंजारा-ओबीसी या विषयावर अधिक प्रभावीपणे चर्चीत होती. तेव्हा जेव्हा रिअॅक्शन आण अॅक्शन मोडवर मतदार असतो तेव्हा तो ओठात एक आणि पोटात एक ठेवून मताचे बटन दाबतो आणि तेच बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी केलय. पाहू आता मतपेटीतून कोणाचे भाग्य उजळते.