महिलेसह मुलांची प्रकृती खालावली
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
बीड (रिपोर्टर) पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसह आपल्या दोन मुलांना गेल्या १२ वर्षांपासून घरामध्ये डांबून ठेवले. या खळबळजनक घटनेची माहिती महिलेच्या बहिणीने बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. संगीता धसे यांना दिल्यानंतर धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने आज सकाळी महिलेच्या घरी जावून तिची सुटका करत तिन्ही माय-लेकरांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मनोज किन्हीकर (कुलकर्णी) रा. जालना रोड परिसर हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयातून त्याने पत्नी रुपाली किन्हीकरसह दोन मुलांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून घरामध्येच डांबून ठेवले. या घटनेची माहिती रुपाली किन्हीकर यांच्या बहिणीने काल बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. संगीता धसे यांना दिल्यानंतर धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेबाबत कळविले व पोलिसांना सोबत घेऊन त्या महिलेच्या घरी गेल्या. महिलेसह दोन मुलांना घरामध्ये डांबून ठेवण्यात आले होते. या तिघांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले. घरामध्ये डांबून ठेवल्याने महिलेची प्रकृती अत्यंत खालावली होती. या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.