केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावर बढती दिल्यानंतरच पदस्थापना
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात रोस्टर परिपुर्ण नसल्यामुळे वर्षेभरापुर्वी तब्बल 700 शिक्षक अतिरिक्त झाले होते. त्यानंतर आत्ता विद्यार्थ्याची संख्या वाढली,286 प्राथमिक शिक्षक हे अतिरिक्त झाले असुन त्यांना पदस्थापना मिळण्यासाठी किमान दोन ते तीन महिने वाट पहावी लागणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या अनेक विभागापैकी सर्वात मोठी कर्मचारी संख्या असलेल्या शिक्षण विभागामध्ये अनेक गुंतागुंत नेहमीच घडतात. त्यामुळे हा विभाग चर्चेत असतो. या जिल्हा परिषदेला कोणीही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी लाभले तरी सुरवातीच्या काही दिवसामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विभागाकडे लक्ष देवून तो सुधरायचा प्रयत्न करतात. मात्र हा विभाग सुधारतच नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ही जावू द्या त्या शिक्षण विभागाबद्दल काही बोलू नका असे म्हणुन हात झटकतात. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये सर्वात जास्त न्यायालयीन खटले दाखल आहेत. असे असतांनाच या विभागात पुन्हा 286 शिक्षक पदस्थापनेविना अतिरिक्त झालेले आहेत. त्यामुळे त्याचे पगार ही बंद आहेत. येत्या दोन महिन्यामध्ये या शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक अशा पदावर बढती दिली जाणार आहे. त्यामुळे जो पर्यंत या दोन पदावरची बढती मिळून जागा रिक्त होत नाहीत तो पर्यंत या 286 शिक्षकांना पदस्थापने विना लटकावे लागणार आहे.










