बीड (रिपोर्टर): कुर्ला गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी यासाठी ग्रामसभा भरवून दारूबंदीचा निर्णय केल्यानंतरही सर्रासपणे दारू विक्रेते अवैधरित्या शाळा, मंदिर, मस्जिद परिसरामध्ये दारू विकत आहेत. ही गंभीर बाब असून ठरावानंतरही गावात दारूविक्री सुरू असल्याने ती तात्काळ बंद करत दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे पोलीस अधिक्षकांना दिले. कुलार्र् येथील महिला सरपंचानी दारूबंदीसाठी थेट महिला आयोगाकडे दाद मागितली.

कुर्ला गावात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होते. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होतेय. मंदिर, मस्जिद, शाळा परिसरामध्ये दारू विक्री होत असल्याने दारूडे महिलांची छेड काढतायत. त्यामुळे गावकर्यांनी ग्रामसभेमध्ये गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव घेतला. मात्र काही दारू माफिये गावामध्ये पोलिसांच्या संगनमताने दारू विक्री करत राहिले. अखेर येथील महिला सरपंचानी थेट महिला आयोगाकडे दाद मागितली. महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन पाठवून गावातली परिस्थिती सांगितली. त्यानंतर काल उशीरा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केला. त्यात ते म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील महिलांनी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून गावातील अवैध आणि बनावट दारू विरोधात आग्रही भूमिका घेत विशेष ग्रामसभा बोलवून दारूबंदीचा ठराव केला. ठराव झाला असला तरी अजूनही गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याचे कुर्ला गावच्या महिला सरपंचांनी राज्य महिला आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पोलीस अधिक्षक बीड यांनी याबाबत तात्काळ कठोर कारवाई करावी, असे म्हणत कुर्ल्याच्या दारूबंदीत आता थेट महिला आयोगांनी लक्ष घातले आहे.










