जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
बीड (रिपोर्टर): गजापूर (विशाळगड) हल्ला प्रकरणी सर्वस्तरातून जाहीर निषेध केला जात आहे. यामध्ये जे जखमी झाले आहेत त्या जखमींना राज्य सरकारने आर्थिक मदत करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे तसेच सदरील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या प्रत्येकाला 5 लाख रुपये शासनामार्फत देण्यात यावे, युएपीआय कायद्यांतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्क्रीय पोलीस अधिकारी व कर्मचार्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून पारीत करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले आहे. या वेळी बबन वडमारे, गंगाधर काळकुटे, फारुक पटेल, खुर्शीद आलम, सुभाष जाधव, इलियास, नसीम इनामदार, अय्युब पठाण, शकील खान, जलील पठाण, शेख निजाम, जैतुल्ला खान, खमरुद्दीन शेख अखिल, बाबा खान, सय्यद सनाउल्ला, देशमुख, सय्यद अब्दुल रौफ, सय्यद सालार, अॅड. राजेंद्र सानप, शेख मुश्ताक, शेख इमरोज यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
19 तारखेला पाटोदा तहसीलवर मोर्चा
उद्या वडवणीत धरणे आंदोलन
विशाळगड घटने प्रकरणाचा सर्वस्तरातून जाहीर निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी पाटोदा तहसीलवर 19 जुलै 2024 रोजी दुपारी दोन वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. जब्बार पठाण, शेख जुनेद, सिद्धीकी रियाज, सुलेमान पठाण यांनी केले आहे. सदरील हा मोर्चा बाजार तळापासून काढण्यात येणार आहे. दरम्यान या घटने प्रकरणी उद्या वडवणी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.








