पुणे पाण्यात, ठाण्यात धुव्वाधार सुरुच, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पालघरमधील नदी-नाल्यांना पूर, कोल्हापूर, सांगली, सातार्यात पूरपरिस्थिती, कोल्हापुरात पंचगंगाची धोक्याकडे वाटचाल,

पुणे/कोल्हापूर (रिपोर्टर): राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाने कहर केला असून पुणे शहरातील बहुतांशी भाग पाण्याखाली आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांचे स्थलांतर सुरु असून एनडीआरएफच्या पथकासह थेट आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. तिकडे ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड जिल्ह्यातही पुरपरिस्थिती पहायला मिळत असून खडकवासला धरणातून रात्री अचानक पाणी सोडण्यात आल्याने पुण्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली.

अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुव्वाधार सुरू केली आहे. याचा फटका जास्त करून पुणे, ठाणे, कोल्हापूर, रायगडसह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला बसताना दिसून येत आहे. या भागातले सर्व धरणे पुर्णत: भरले असून चांगला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कोयना धरणासह अन्य मध्यम धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने अनेक नद्यांना महापूर येत आहे. ठाण्यात धुव्वाधार सुरु असल्याने शिळा फाट्यावर पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तिकडे मुंबईतही मोठा पाऊस सुरु असून दहीसर, आनंदनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सांगलीच्या कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी घुसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून नगरपालिकेकडून दूध आणि बिस्कीट सकाळी लोकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असून पालघर जिल्ह्यात नद्या-नाल्यांना पूर आल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसे ठाणे, पुणे, रायगडसह आदी भागात शाळांना सुट्टी देण्यात आली असून खडकवासला धरणातून मोठा नदी पात्रात 35 हजारापेक्षा जास्त क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने पुण्यातील परिस्थिती कायम राहण्याचे चिन्ह आहेत. इकडे पिंप्री चिंचवड भागातही पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापुरातील संततधारेने पंचगंगा नदी पात्रात पुरपरिस्थिती झाली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात शॉक लागून तिघांचा बळी गेला तर लवासामध्ये दरड कोसळल्याने चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तामनी घाटात दरड कोसळ्याने एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सदरची परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या पथासह थेट आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अलर्ट मोडवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री तता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये त्याचबरोबर सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांनी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याबरोबर घटनास्थळावर पाठवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट आर्मीला पाचारण केले आहे.











