बीड (रिपोर्टर): चर्हाटा येथे आठ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले. मात्र याठिकाणी वीज नसल्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडून आहे. वीज जोडणीसाठी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी काखदरा येथील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी स्विकारले.
बीड तालुक्यातील चर्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आठ वर्षांपूर्वी 5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. याठिकाणी विजेची व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडून आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही याची दखल संबंधित विभाग घेत नसल्याने आज सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रासमोरील काखदरा साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, बप्पासाहेब पवार, मनोज तांदळे, सुभाष बांगर, संपत नागरगोजे, सुर्यकांत नागरगोजे, हरीचंद्र जाधव, भगीरथ उबाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. शाखा अभियंता, बांधकाम विभागाचे सचीन शेकडे, तलाठी खांदे, उपनिरीक्षक कुकलारे यांनी निवेदन स्विकारले.










