बीड (रिपोर्टर): पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बीड -नाथापूर रोडवर मोठ्या प्रमाणावर धाबे दिसून येतात. मौजे म्हाळसजवळा परिसरामध्ये अनेक धाबे असून या धाब्यांवर सर्रासपणे अवैधरित्या देशी दारूसह अन्य विदेशी दारूची विक्री केली जाते. परिणामी त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांपासून घराघरातील महिलांमध्ये उमटताना दिसून येत असून या धाब्यांवरची अवैधरित्या होणारी दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांसह नागरिकांतून होत आहे. अवैध दारू विक्रीमुळे या परिसरात छोट्या-मोठ्या भांडणांसह अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत चालले आहेत.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर धाबा संस्कृती पहावयसा मिळते. दोन-पाच टेबल, पाच-दहा खुर्च्या आणि पत्र्याचे शेड टाकून समोर शुद्ध शाकाहारी, मांसाहरी जेवणाची पाटी लावायची आणि त्याआडून सर्रासपणे देशी दारूसह विदेशी दारूची अवैध पद्धतीने विक्री करायची, हा धंदा म्हाळसजवळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. या भागात अनेक धाबे असून त्या धाब्यांमध्ये अवैध दारू सर्रासपणे विक्री केली जाते. म्हाळसजवळा हे शाळा, महाविद्यालयाचे ठिकाण आहे. याठिकाणी चार ते पाच गावातील विद्यार्थी-विद्यार्थीनी ज्ञानार्जनासाठी येतात. ज्या रस्त्यावरून हे विद्यार्थी प्रवास करतात, पायी चालतात त्याच रस्त्यावर संबंधित धाबे असल्याने अनेक बेवडे रस्त्यावर डुलताना दिसून येतात. या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त होताना दिसून येतात. सर्रासपणे दारू विक्री होत असताना दारूबंदी विभाग, बीड पोलीस आणि पिंपळनेर पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहे. सदरची दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह महिला व पालकांतून होत आहे.










