बीड, (रिपोर्टर) ः महिलांची आर्थिक उन्नतीत व्हावी या दृष्टीकोनातून बचतगट संकल्पना राबवण्यात आली. बचतगटामुळे महिलांमध्ये संघटन वाढलं. त्याचबरोबर आर्थिक उन्नती वाढली. बचतगट एक चळवळ निर्माण झाली. बीड जिल्ह्यात 17,819 गट असून या गटांना गेल्या 10 महिन्याच्या कार्यकाळात 9 कोटी 80 लाख 63 हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. काही बचतगटांनी विविध व्यवसाय उभारलेले आहेत. त्या व्यवसायातून बचतगट महिलांचा विकास होत आहे. बचतगटातील महिलांनी शेतकरी उत्पादक कंपनी देखील स्थापन करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात 8 शेतकरी उत्पादक कंपन्या महिलांच्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून बचतगट ही संकल्पना रूजवण्यात आली. या संकल्पनेचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. प्रत्येक गावामध्ये बचतगट सुरू करण्याची मोहीम राज्य सरकारने मोहीम हाती घेतली होती. बचतगटामुळे महिला एकत्रित झाल्या, संघटित झाल्या व आर्थिक उन्नतीदेखील करू लागल्या. बचतगटांना शासनाने उद्योगासाठी कर्ज देण्यास सुरूवात केली. त्यातून हजारो बचत उद्योजक बनले. काहींची वार्षिक उलाढाल लाखो रूपयात होऊ लागली. बीड जिल्ह्यामध्ये 17,819 बचतगट असून या गटांना 9 कोटी 80 लाख 63 हजार रूपये कर्जाचे वाटप करण्यात आले. 17 हजार पैकी 398 बचतगट उत्पादक बचतगट म्हणून पुढे आले आहे. उत्पादक बचतगट विविध उत्पादनांची निर्मिती करून त्याची बाजारात विक्री केली जात आहे. महिला बचतगटांनी शेतकरी उत्पादक कंपन्यादेखील स्थापन करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात 8 शेतकरी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जिल्ह्यातल्या 17 हजार बचतगटांची वार्षिक उलाढा कोटीं रूपयांपेक्षा जास्तीची झाली आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात बचतगटात महिलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे.








