बीड, (रिपोर्टर)ः- : खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांची वेतनवाढ होत नाही. त्यातच संस्था चालकांच्या होणा-या सततच्या त्रासामुळे बीडच्या एका शिक्षकाने फेसबुक पोस्ट करुन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून शासनाच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त होत आहे.
डी.एड, बी.एड करून तुटपुंज्या पगारावर शिक्षक पदरमोड करून खासगी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत आहे. आज ना, उद्या वेतन वाढ होईल, या आशेवर गुरूजी अनुदानित माध्यमिक विद्यालयात मुलांना शिकविण्याचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. कधी ना कधी तरी आपल्याला पूर्ण पगार मिळणार, या भरवशावरील गुरुजी आज आपल्या संसाराचा गाडा तोकड्या पगारावर चालवत आहेत. अल्पशा वेतनावरच दिवसेंदिवस संसाराचा गाडा चालवणा-या वेतनवाढ होत नससल्याने काही गुरूजींनी आत्महत्या तर काहींचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अर्धावरच डाव सोडवून शिक्षक गेले तरी, सरकारकडून ठोस निर्णय होत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात काही तरी निर्णय होईल, अशी आस होती. परंतू अर्थसंकल्पात अनुदान तर नाहीच शिवाय शिक्षक वेतनवाढ संदर्भात काहीच तरतूद करण्यात आलेली नाही.
अशातच बीड येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. धनंजय नागरगोजे या शिक्षकाने फेसबुकवर पोस्ट करत संस्था चालक यांच्या त्रासास व वेतनवाढ होत नसल्याने आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. असे किती गुरुजींचे बळी घेतल्यानंतर सरकार अनुदान देऊन शंभर टक्के वेतनवाढ देणार, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शासनाच्या या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.








