
रात्री-अपरात्री सर्वसामान्यांनी टीप देताच लाचखोर अधिकारी-कर्मचारी माफियांना सांगतात खबर देणार्याचे नाव
यातून घडतात मारामारीच्या घटना, होतो सर्वसामान्यांवर अन्याय
गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यात गोदाकाठ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू माफिये वाळुची तस्करी करतात हे सर्वश्रूत आहे. माफियांविरोधात पोलीस अधिक्षकांनी मोहीम उघडलेली असताना महसूलचे अधिकारी, कर्मचारी मात्र माफियांचे हस्तक झाल्याचे दिसून येत आहे. गोदावरी नदी पात्रातून वाळुचा उपसा सुरु असल्यास काही गावकरी याची गोपनीय माहिती तलाठी अथवा तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना देतात. मात्र हेच महसूलचे अधिकारी आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई न करता ती माहिती संबंधित माफियांना देतात. त्यामुळे गेवराई तालुक्यात सातत्याने वाळूचोर, माफिया व सर्वसामान्यात वाद होतो. माफिये पैशाच्या जोरावर प्रशासनाला टीप देणार्या लोकांना मारहाणही करतात आणि इथेच मग गँगवॉर, रक्तरंजीत घटना घडतात. जिल्हाधिकार्यांनी गेवराई तालुक्यातील महसूल विभागातल्या अधिकार्यांना थोडी तरी शरम बाळगा म्हणत टीप देणार्यांचे कौतुक करा आणि माफियांचे कंबरडे मोडा असे सक्त आदेश द्यावेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून गेवराई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळुची तस्करी केली जाते. कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या उद्देशाने अनेकजण या धंद्यामध्ये उतरले आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाला हप्त देत सर्रास शेतकर्यांच्या शेतातूनही वाळुचे टिप्पर, ट्रॅक्टर नेले जातात. गेल्या काही दिवसांच्या कालखंडामध्ये अनेक शेतकरी, सर्वसामान्य गोदापात्रातून कोणी जर वाळूउपसा करत असतील तर त्याची माहिती तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार अथवा अन्य अधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून देतात. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यापेक्षा हे लाचखोर आलेली माहिती संबंधित माफियांना देतात. एवढेच नव्हे तर कुठल्या नंबरवरून फोन आला तो नंबरही देऊन टाकतात त्यामुळे माफिये चिडून वाळुची टिप देणार्या लोकांना मारहाण करतात. त्यामुळे दोन गट निर्माण होऊन कधी कधी तुंबळ मारामारी आणि यातून रक्तरंजीत भांडणे होत मुडदेही पडतात.
एकूणच केवळ महसूल प्रशासनाच्या लाचखोरीमुळे गुन्हेगारी वाढत चाललीय आणि सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. जिल्हाधिकार्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात गेवराई तालुक्यात रात्री-अपरात्री काहींनी तहसीलदारापासून तलाठी मंडळ अधिकार्यांपर्यंत माहिती दिल्या. मात्र ज्यांनी माहिती दिली त्यांचे नाव या लाचखोरांनी वाळू माफियांना सांगितले. असे प्रकार उघडकीस आले आहे.








