
शेतकरी रडकुंडीला, कांद्याचा वांदा, आंब्यासह फळबागांना फटका
पंचनामे तात्काळ करा नसता शेतातच उपोषण करू, अनेक शेतकर्यांचे इशारे
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): गेल्या आठवड्याभरापासून बीड जिल्ह्यात संततधार कोसळत असल्याने नद्या-नाल्यांना पूर आले. शेतातील कांद्यासह अन्य पिके उद्ध्वस्त झाले. आंबा व अन्य फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. आधीच सातत्याने संकटाच्या छायेत असलेल्या शेतकर्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतातील कांद्यासह अन्य पिकांचे नुकसान झालेले असताना महसूल विभाग मात्र पंचनामे करण्यासाठी शेतकर्यांच्या बांधावर दिसून येत नाही. आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, बीड, गेवराई, धारूर, वडवणी आदी तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून पंचनामे झाले नाही तर शेतकरी थेट शेतात उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे.

बीड तालुक्यातील मुर्शदपूर, सात्रापोत्रासह अन्य भागांमध्ये धुव्वाधार पावसामुळे शेतातले कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले. हातातोंडाशी आलेला लाखो रुपयांचा कांदा पाण्यात गेला. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही प्रशासन शेतकर्यांच्या पिकांचा पंचनामा करण्यासाठी अद्याप शेतकर्यांच्या बांधावर पोहचला नाही. मुर्शदपूर, सात्रापोत्र्याचे तलाठी अदापुरे फोन उचलत नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून येत आहेत. आज पंचनामे झाले नाही तर उपोषणाचा इशारा शेतकर्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शासनाला दिला आहे. जी स्थिती मुर्शदपूर, सात्रापोत्र्याची आहे तीच परिस्थिती अन्य भागातली आहे. माळापुरी याठिकाणी शेतकरी राजेंद्र पाटील यांची विहीर ढासळली. त्यातही त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्याने अनेकांच्या शेती वाहून गेली आहे. आंबा यासह अन्य फळबागांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकर्यांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्यात हजार हेक्टरच्या आसपास कांद्याची लागवड असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.








