छोट्या-मोठ्या आघाड्यांचे बैठकसत्र सुरू;
नागरिकांचे प्रश्न आता गांभीर्याने
पात्रुड (रिपोर्टर) : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय पक्ष व आघाड्या ससज्ज होत आहे. राजकीय पक्ष मुळात निवडणुका लढविण्यासाठीच आहे, असे मानले जात आहे. परंतु विविध सामाजिक संघटनांचे एकत्रिकरण करून समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी छोट्यामोठ्या आघाड्या तयार करीत आहे. त्यांच्या बैठकांचे सत्र सध्या सुरू आहे. निवडणुकीपूर्वीची ही तयारी ऐन मतदानावेळी मतदारांच्या किती पसंतीला उतरतील, याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहे.
निवडणुका या आता मतदारांच्या मतदानापुरत्याच उरल्या नाहीत. या निवडणुकांना सामाजिक अडचणी व समस्यांचे कोंदणही चिकटले आहेत. त्यामुळे सामाजिक संस्था समाजाचे प्रश्न व नागरिकांच्या अडचणींना एकसुत्रात बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षात प्रत्येक निवडणुकीत हिंदू-मुस्लीम व इतर राजकीय मुद्यांना समोर करून निवडणुका लढल्या गेल्या. समाजाचे व मतदारांचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांनी तोंड वर काढल्यानंतर सामाजिक संघटनांची जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या कामाकडे नागरिकही मोठ्या अपेक्षेने बघत आहे. परिणामी, बीड शहरात अशा अनेक संघटना सक्रिय झाल्या आहेत. या संघटनांमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते हे थेट नागरिकांशी जुळलेले आहेत. त्यांना ते आपल्या हक्काचे वाटतात. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागीही होतात. त्यामुळे ही व्याप्ती अधिक वाढवून जगण्याचे प्रश्न अधिक सुलभ करण्यासाठी या संघटनांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे राज्यात
राज्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे त्यांच्या पक्ष व नेत्यांशी बांधील आहेत. उलट सामाजिक संघटनांना कुणाचेही बंधन नाही. ते राजकीय अडचणीत येण्याची शक्यताही नाही. परिणामी, त्यांना समाजातील प्रश्नांची असलेली जाण लक्षात घेता राजकारणाच्या रिंगणात उतरून त्या त्या भागाचे प्रश्न राजकीय पटलावर आणण्यासाठी दबाव वाढत आहे. यातूनच छोट्या मोठ्या आघाड्या आकार घेत आहे.बीड जिल्ह्यात अशा अनेक आघाड्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.या आघाड्या अनेक समाजघटकांशी संबंधित असल्याने समाज म्हणून व समाजातील व्यक्ती म्हणून त्यांच्यापुढे मनमोकळेपणाने आपले प्रश्न मांडण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, अशी पक्की समज अनेक भागातून पुढे येत आहे.
ओबीसी, मुस्लीम प्रतिनिधीही सरसावले
गेल्या काही वर्षात निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. राजकीय पक्षांनी या जातीपातीतील प्रतिनिधींना आपले हक्काचे मतदार बनविले. निवडणुकीपर्यंत त्यांचा वापर केला जातो. प्रत्यक्षात त्यांच्या समाजाचे प्रश्न कायम आहे. ओबीसी हा मोठा घटक आहे. अवघ्या राज्यात ओबीसी समाज घटकाचे प्रश्न आजही चर्चेत आहेत. अनेक मोठ्या संघटना यासाठी संघर्षरत आहेत. मोठा मतदार असल्याने या संघटनांशी जुळलेले हजारो कार्यकर्ते निवडणुकीत निकालाची दिशा बदलवू शकतात. मुस्लीम समाजातही आता त्यांच्या वापरावरून चीड निर्माण होत आहे. मुस्लीम मतदारांची संख्याही जिल्ह्यात लक्षवेधी आहे. अशा अनेक संघटनांनी धर्मनिरपेक्षता व सामाजिक एकतेचा विचार करून एकत्रितपणे समाजाचे प्रश्न सोडविनाचा चंग बांधला आहे.
आंबेडकरी विचारांचे बळकटीकरण,
एकसुत्रीपणासाठी विचारमंथन सुरू
रिपाइं कायम गटातटात विखुरलेला पक्ष आहे. आता या पक्षातली अनेक गट इतर पक्षांच्या युतीत बांधले गेले आहेत. त्यामुळे आंबेडकरी
चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. यातूनच नवनव्या आघाड्या तयार होत आहे. या आघाड्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा समावेश असून त्यांची वैचारिक प्रगल्भता शाबूत आहे. त्यांना समाजाचे हित व प्रश्नांची जाण आहे. यातूनच निर्माण झालेल्या अनेक छोट्या मोठ्या आघाड्या व संघटनांमध्ये एकसुरीपणा आणण्यासाठी विचारमंथन सुरू आहे









