बीड/कुक्कडगाव (रिपोर्टर)- सिंदफणा, गोदावरी, टुक्कडमोडी, करपरा यासह अन्य नदी पात्रातून दिवसरात्र वाळुचा बेसुमार उपसा होत आहे. या वाळु उपश्याकडे महसूल आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वाळु माफियांनी आतापर्यंत अनेक वेळा महसूल विभागाच्या कर्मचार्यांवर हल्लेदेखील केले आहेत.
आता वाळु माफियातच वाळु उपसण्याच्या कारणावरून हाणामार्या होऊ लागल्या आहेत. आज सकाळी सिंदणा नदीच्या पात्रात ट्रॅक्टर चालक आणि जेसीबी चालकात वाळू भरण्यावरून हाणामार्या झाल्या. घटनेची माहिती बीड तहसील आणि पिंपळनेर पोलिसांना कळविण्यात आली होती. या प्रकरणी दुपारपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नव्हती.
बीड जिल्ह्यामध्ये विविध नदी पात्रातून वाळुचा सर्रासपणे उपसा केला जात आहे. वाळु माफियांवर कठोर कारवाई केली जात नसल्यानेच वाळु माफियांनी उच्छाद् मांडला. गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात आतापर्यंत अनेक वेळा महसूलच्या कर्मचार्यांवर वाळु माफियांनी हल्ला केलेला आहे. आता वाळु माफियातही वाळू भरण्याच्या कारणावरून हाणामार्या होऊ लागल्या आहेत. बीड तालुक्यातील कुक्कडगाव, चव्हाणवाडी, खुंड्रस या शिवारातील सिंदफणा नदी पात्रातून वाळुचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. आज सकाळी जेसीबी चालक आणि ट्रॅक्टर चालकात वाळू भरण्यावरून हाणामारीची घटना घडली. घटनेची माहिती बीड तहसीलदार आणि पिंपळनेर पोलिसांना कळविण्यात आली होती. त्यानुसार पोलिस दाखल झाले होते.
या प्रकरणी मात्र दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नदी पात्रातील १५ ब्रास वाळू बीडच्या तहसीलदारांनी जप्त केली होती. तरीही नदी पात्रात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा केलेला आहे. जवळपास २०० ब्रास वाळु साठा नदीच्या पात्रात आज सकाळी दिसून आला. सात जेसीबी आणि २३ ट्रॅक्टरद्वारे वाळुचा उपसा होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नदी पात्रातील वाळू वाळु माफिया उपसत असतानाही त्यांच्या विरोधात अद्यापपर्यंत महसूल प्रशासनाने कठोर कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.