बीडमध्ये आणखी एक अपहरणकांड, दोघांना अटक
Crime in Beed: बीड जिल्ह्याच्या धारूरमध्ये एक अपहरण कांड उघडकीस आलं आहे. हात उसणे घेतलेल्या पैशांसाठी चार जणांनी एका तरुणाचं अपहरण केलं आहे.
बीड:
मागील काही दिवसांत बीडमध्ये अपहरण, खून आणि खंडणीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले गँगने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अपहरण केलं होतं. यानंतर नराधमांनी अमानुष मारहाण करत संतोष देशमुखांचा जीव घेतला. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले. ही घटना ताजी असताना बीड जिल्ह्याला हादरवणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे.
बीड जिल्ह्याच्या धारूरमध्ये एक अपहरण कांड उघडकीस आलं आहे. हात उसणे घेतलेल्या पैशांसाठी चार जणांनी एका तरुणाचं अपहरण केलं होतं. मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये टाका, अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. इतर दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा हजार रुपयांचे व्याजासह 80 हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी चौघांनी एका तरुणाचं अपहरण केलं होतं. तसेच आरोपी अपहरण झालेल्या मुलाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताचे आता पन्नास हजार रुपये टाका, नाहीतर तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली. तर दोघेजण फरार आहेत.







