
पुणे, (रिपोर्टर)ः- ‘राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरविणार नाही. कर्जमाफी कधी करायची, यासंदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत त्यामुळे याबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ृसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘वारकरी भक्तियोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. आळंदीजवळील मोशीतील प्रस्तावित कत्तलखान्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘विकास आराखड्यात आळंदीजवळ मोशीमध्ये कत्तलखान्याचे आरक्षण दाखविले आहे. कोणत्याही परिस्थितीत आळंदीजवळ कत्तलखाना करता येणार नाही.
त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वत: दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये किंवा त्याजवळ मोशीत अशाप्रकारे कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.’ पालखी सोहळ्यादरम्यान आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी वारकरी, पत्रकार आणि पोलिस अधिकार्यांना केलेल्या दमदाटीच्या प्रकरणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पालखी सोहळा हा अतिशय आनंददायी आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी आहेत. परंतु, भविष्यात असे प्रकारे घडू नयेत, यासाठी संबंधितांशी चर्चा करण्यात येईल.’








