अपघात विमा योजनेचे प्रस्ताव घेणे पाच महिन्यापासून बंद; सर्वसामान्य शेतकर्यांसह मुंडे समर्थकांत संताप
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रातील कष्टकर्यांचा बुलंद आवाज म्हणून आपले उभे आयुष्य खर्ची घालणारे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने अपघात विमा योजना काढून लोकहिताचा निर्णय आणि कष्टकरी, कामगार, शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केला. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि ज्या पक्षासाठी स्व.मुंडेंनी आपले उभे आयुष्य खर्च केले त्या भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र दुर्देवाने गेल्या पाच महिन्यापासून स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा एकही अर्ज राज्यात स्विकारला नाही. शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेला मुदतवाढच दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात सर्वसामान्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारने शेतकर्यांसाठी सुरू केलेली गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला यावर्षी मुदतवाढ मिळालेली नाही. हे वर्ष संपत आले तरी सरकारने या विमा योजनेला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे 6 एप्रिल 2022 पासून या अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकर्यांचे प्रस्ताव घेणे बंद आहे. गेल्यावर्षी 7 एप्रिल 2021 रोजी या योजनेला मुदतवाढ दिल्याने अपघातग्रस्त शेतकर्यांचे विमा योजनेचे प्रस्ताव घेण्यात येत होते. यावर्षी मात्र 5 महिने उलटले तरी राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकर्यांचे कुटूंबीय या विमा योजनेच्या मुदतवाढीची प्रतिक्षा करत आहेत. गेल्यावर्षी 7 एप्रिल 2021 रोजी एका वर्षभरासाठी या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकर्यांचे कृषी विभागाने प्रस्ताव घेतले होते. गेल्या वर्षभरात 295 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी 57 प्रस्तावाला मंजूरी मिळालेली होती. 223 प्रस्ताव अद्यापही मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकर्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटूंब आर्थिक अडचणीत येते. त्यामुळे या शेतकर्यालाआर्थिक मदत व्हावी म्हणून महाविकास आघाडी सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केली होती. प्रत्येकवर्षी राज्य सरकारकडून प्रस्ताव घेण्यासाठी मंजूरी दिली जाते. गेल्यावर्षी या विमा योजनेला मंजूरी दिल्यानंतर राज्यभरातून 295 अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी 266 अर्ज कृषी विभागाकडून विमा कंपनीकडून स्विकारून त्यातून 57 अर्ज निकाली काढून या कुटूंबीयांना विमा योजनेचा लाभ देण्यात आला होता. 7 एप्रिल 2022 पासून म्हणजेच गेल्या पाच महिन्यापासून या योजनेला मुदतवाढ झालेली नाही. त्यामुळे गेल्यावर्षी मंजूरीच्या प्रतिक्षेत असलेले अर्ज आणि यावर्षी ज्या शेतकर्यांचा अपघात झालेला आहे किंवा अपघातग्रस्त शेतकर्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे कुटूंबीय या विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारकडून मंजूरीची वाट बघत आहेत. अपघातग्रस्त शेतकर्याचा मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रूपये लाभ या विमा योजनेतून देण्यात येतो. विज पडून मृत्यू होणे, सर्पदंशी, विंचू, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात किंवा विद्युत शॉक लागुन मृत्यू झाल्या, अंधत्व आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्या कुटूंबीयाना दोन लाख रूपये या विमा योजनेअंतर्गत देण्यात येतात. या विमा योजनचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना कोणत्याही विमा योजनेचा लाभ घेतलेला नसावा, त्याचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 75 वर्षे याच्यापुढे नसावे अशा अटी आहेत.