
टॅक्स वाचविण्यासाठी खाटोकर वेगवेगळ्या क्लासेसचा मालक
क्लासेसच्या शिक्षकांची हजेरी, सुट्ट्यांच्या नोंदी, विद्यार्थ्यांची हजेरी रेकॉर्ड नाही
पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवले
खाटोकरची दुचाकी जप्त, दोघांचे मोबाईल, टॅब जप्त
40 सीसीटीव्हीमध्ये केवळ 20 दिवसांचा डेटा
जुना डेटा रिकव्हर करण्यासाठी डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबला पाठवले
सर्वात महत्वाचे पोलीस घटनेचे रिक्रिएशन करणार
बीड (रिपोर्टर): अवगा महाराष्ट्र हादरवून सोडणारी आणि पालकांची चिंता वाढवणार्या बीडमधील उमाकिरण शिक्षण संकुलच्या लंपट शिक्षक विजय पवार त्याचा साथीदार संतोष खाटोकर यांच्या पापाचा घडा भरला नाही तर तो ओसंडून वाहत असल्याचे आता तपासात समोर येत आहे. मुलींसोबत अश्लिल चाळे करणार्या विजय पवारने शासनाची फसवणुक करण्यासाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी खाटोकरलाच वेगवेगळ्या क्लासेसचा मालक केल्याचे समोर आले असून शिक्षकांच्या हजेर्या, सुट्ट्यांच्या नोंदी आणि विद्यार्थ्यांबाबत कुठलेही हजेरी रजिस्टर रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी या दोघांबाबत आणखी फास आवळला असून आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. खाटोकरची दुचाकी, आणि दोघांचेही मोबाईल, टॅब, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून त्यामध्ये केवळ 20 दिवसांचा डाटा उपलब्ध असल्याने डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी विजय पवार व खाटोकरला सोबत घेऊन घटनेचे रिक्रिएशन करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमाकिगरण शिक्षण संकुलसह अन्य संस्थांचा कर्ताधर्ता असलेला विजय पवार याने पैसा आणि राजकीय बळावर आतापर्यंत शिक्षणाचा बाजार बसवत आपले गोरख धंदे सुरू ठेवले. मात्र जेव्हा गुन्ह्याची शंभरी होते तेव्हा पापाचा घडा भरतो. एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाबाबतची तक्रार आल्यानंतर विजय पवारचा खरा चेहरा समाजासमोर आला आणि त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या घटनेने उभ्या महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. विधानसभेतही याचे पडसाद उमटले. तसे पोलिसांनी विजय पवार आणि त्याच्या साथीदारावर फास आवळायला सुरुवात केली. पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवले आहेत. पिडितेच्या मैत्रीनी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत पोलिस तपासत आहेत. त्यामध्ये पवार याने कर वाचवण्यासाठी खाटोकरला वेगवेगळ्या क्लासेसचा मालक दाखवलं आहे. शिक्षकांचे हजेरी पुस्तक, सुट्ट्यांची नोंदी, विद्यार्थ्यांची हजेरी याबाबतचे कुठलेही नोंदी ठेवल्याचे दिसून आले नाही.
या प्रकरणात पोलिसांनी दोघांचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब जप्त केले आहे. क्लासेसमधील 40 सीसीटीव्ही कॅमेरे व त्याचे डीव्हीआर जप्त करण्यात आले असून त्यात केवळ 20 दिवसांचा डेटा असल्याचे सांगण्यात येते. घटना वर्षभराची असल्याने जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाणार आहे. या प्रकरणात पिडितेने घटनास्थळ दाखवले, त्याचा पंचनामा करण्यात आला, त्याचबरोबर पिडितेने थेट न्यायालयातही जबाब दिला आहे. त्यामुळे आता पोलीस दोन्ही आरोपी शिक्षकांना सोबत घेऊन घटनेचे रिक्रिएशन करण्याची तयारी करत आहेत. नेमकी घटना कशी घडली, त्यात कशाप्रकारे आरोपींना कायदा मोडला. कोणत्या बाबी सीसीटीव्हीत नोंद झाल्या, बाकीच्या का झाल्या नाही यासह अन्य बाबींसाठी हे रिक्रिएशन केले जाणार आहे.






