
धारूर (रिपोर्टर): 2 हेक्टर 10 आर जमीन नावावर करून देतो, असे म्हणत तब्बल 38 लाख रुपये घेऊन एका प्राध्यापकाची फसवणूक केल्याची गटना उघडकीस आली आहे. पैसे घेतल्यानंतर जमीन नावावर न करता आरोपी फरार झाले. सरशेवटी सदरील प्राध्यापक यांनी धारूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर चौघा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
याबाबत अधिक असे की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील नंदनवन कॉलनी येथे प्रा. अशोक नामदेव शिंदे हे राहतात. ते एमजीएम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांची सासरवाडी ही हिंगणवाडी आहे. अशोक शिंदे यांच्या सासर्याचे मित्र राजाभाऊ सोळंके हे गेल्या दोन वर्षांपूर्वी मुलगा आजारी आहे, उपचारासाठी पैशाची गरज आहे यासाठी शिंदे यांच्याकडे आले. त्यांच्याकडून नगदी 20 लाख रुपये घेतले. ते 20 लाख रुपये परत देणे अवघड झाल्याने सोळंके यानीं आपली जमीन देतो, असे म्हटले. त्या जमीनीवर आठ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा बोजा होता.
तो बोजा प्रा. शिंदे यांनी भरला, असे तब्बल 38 लाख रुपये सोळंके यांनी शिंदे यांच्याकडून उचलले. मात्र जेव्हा रजिस्ट्री करण्याची वेळ आली तेव्हा शंभर रुपयांच्या बॉन्डवर त्यांनी नोटरी केली. त्यानंतर मात्र संबंधित व्यक्ती हा फरार झाला. शेवटी प्रा. शिंदे यांनी दिंद्रुड पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून राजाभाऊ जालिंदर सोळंके, जालिंदर बबन सोळंके, सुदामती जालिंदर सोळंके आणि संगीता राजाभाऊ सोळंके यांच्या विरोधात गु.र.नं. 168/2025 कलम 420, 109, 504, 506, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





