
शहरातला कचरा खंडेश्वरी परिसरात टाकला
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष उपाययोजना आखाव्या लागत असतात मात्र नगरपालिका प्रशासन कुठेही कचरा टाकून शहरामध्ये घाण पसरवत आहे. खंडेश्वरी दीपमाळ परिसर ऐतिहासिक आहे. या ठिकाणची योग्य निगा राखणे गरजेचे असताना न.प. प्रशासन दीपमाळ परिसरात कचरा टाकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील कचरा उचलून इतर ठिकाणी टाकण्यात यावा व इथून पुढे याठिकाणी कचरा टाकू नये, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात नाहीत. वेगवेगळ्या भागातला कचरा वेगवेगळ्या ठिकाणी टाकला जात आहे. त्यामुळे त्या त्या परिसरात पुन्हा घाण पसरून त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. खंडेश्वरीचा परिसर हा ऐतिहासिक आहे. त्याठिकाणी दीपमाळ आहे. त्या परिसरात नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कचरा टाकला. या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भाविक व पर्यटक या परिसरात नेहमी जातात, त्यांना या कचर्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक ठिकाणी अशा पद्धतीने घाण करणे योग्य आहे का? उलट नगरपालिका प्रशासनाने ऐतिहासिक क्षेत्राची जोपासणा करून या ठिकाणी स्वच्छता राबवणे गरजेचे आहे. सदरील ठिकाणी कचरा टाकू नये अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.








