
इंधन वाहकासह टेंडर असताना घंटा गाडी आणि ट्रॅक्टरला न.प.कडून डिझेलचा पुरवठा, रोज अडीचशे ते तीनशे लिटर डिझेलचे पैसे उचलले जातात
टेंडरमध्ये कर्मचार्याची पार्टनरशीप, मुख्याधिकार्यांची मूक संमती?
बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिकेकडे कचरा उचलण्यासाठी असलेल्या घंटा गाड्यांसह ट्रॅक्टरचे टेंडर हे इंधन वाहकासह काढलेले असताना नगरपालिकेमार्फत या वाहनांना रोज तब्बल अडीचशे ते तीनशे लिटर डिझेल पुरवल्याचे दाखवले जात आहे. सदरचा प्रकार हा रोज अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार करणारा असून इंधन वाहकासह टेंडर असताना नगरपालिका डिझेल का देते? हा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित टेंडरमध्ये एका कर्मचार्याची पार्टनरशीप असल्याचे सुत्रांचे सांगणे असून या गंभीर प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. हा प्रकार मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या मर्जीने होत असल्याचेही बोलले जाते.
बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे याचंया कार्यकाळामध्ये नगरपालिकेमध्ये पूर्णत: सावळा गोंधळ नव्हेत र भ्रष्टाचार शिष्टाचार होऊन बसल्याचे अनेक वेळा अनेक प्रकरणातून दिसून येते. अंधारेंविरोधात सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांनी अनेक तक्रारी केल्या मात्र शासन आणि प्रशासन अंधारेंना पाठिशी घालत असल्याने त्या भ्रष्टाचाराला शिष्टाचार दाखवत बीड नगरपालिकेचे कामकाज करत आहेत. आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे बीड शहरात अस्वच्छता असताना कचरा उचलण्यासाठी या घंटा गाड्या आणि ट्रॅक्टर आहेत. त्याचे टेंडर इंधन वाहकासह काढण्यात आलेले आहे. या वाहनांमध्ये खरं पाहिलं तर गुत्तेदाराने डिझेल टाकायला हवे होते, मात्र रोज अडीचशे ते तीनशे लिटर डिझेल या घंटा गाड्या आणि ट्रॅक्टरला दिले जात असल्याचे सांगून पैसे उचलले जात आहे. रोज अडीच लाखाच्या आसपास हा डिझेलचा घोटाळा सर्रासपणे सुरू असल्याचेही सांगण्यात येते. ज्याच्याकडे हे टेंडर आहे त्याचा पार्टनर बीड नगरपालिकेत चांगल्या पदावर असलेला एक निर्वाढलेला अधिकारी असून त्याचेच काही वाहने कचरा उचलण्यासाठी दाखवले जातात, असेही सांगितले जाते. एकूणच मुख्याधिकारी नीता अंधारे काही कर्मचारी, अधिकार्यांना हाताशी धरून नगरपालिकेत भ्रष्ट कारभार करत असल्याचे यातून स्पष्ट होते. या डिझेल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
कित्येक वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या गाड्या न.प.कडे किरायाने
न.प. मुख्याधिकार्यांसह अन्य अधिकार्यांना वापरण्यासाठी खासगी गाड्या भाड्याने घेतल्या जातात. नियमानुसार या गाड्या घेताना टॅक्सी परमिट असायला हवे. मात्र तसे न करता कित्येक वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या गाड्या न.प.कडे भाड्याने असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या गाड्या टॅक्सी परमिट नाहीत.
घंटा गाडी चालकांचे पगारा नाहीत
भ्रष्टाचाराच्या चिखलात नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: डुबक्या मारत असताना रोज लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत असताना घंटा गाड्यांवरील चालकांच्या पगारी थकवल्याचेही समोर आले आहे. एकीकडे पैसा ओरबाडायचा दुसरीकडे सर्वसामान्य चालकांना मात्र त्यांच्या हक्काच्या पैशासाठी ताटकळत ठेवायचे हे धोरण सध्या न.प.मध्ये दिसून येते.








