
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग
बीड (रिपोर्टर): परळी येथील व्यवसायिक महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक होत असून या बैठकीला हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती आहे. बैठकीमध्ये आंदोलनाबरोबर आंदोलनाची रुपरेषा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात येते. बैठक दुपारी दोन वाजता सुरू झाली तर दुसरीकडे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतल्यानंतर महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचे दिसून येते. रात्रीपासून बारा जणांची चौकशी झाल्याचेही सुत्रांचे सांगणे आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, अद्याप कोणीही ताब्यात नाही. चौकशी आणि तपास सुरू आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्याअनुषंगाने गेल्या आठवड्यात जरांगे यांनी याबाबत बीडमध्ये बैठक बोलवली होती. आज ती बैठक रामकृष्ण लॉन्स याठिकाणी होत आहे. दीड वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे बैठकीच्या ठिकाणी डेरेदाखल झाले. या वेळी बैठकीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये नेमके काय ठरते हे काही वेळानंतर कळेल. तर दुसरीकडे काल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य करत तपासाचे आदेश दिले असता आता मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. बारा जणांची चौकशी झाल्याचे सांगण्यात येते.








