बीड, (रिपोर्टर)ः- प्रत्येक वर्षी जुन महिन्यामध्ये जिल्हा विकास निधीतून विकास कामांसाठी निधी मिळत असतो. मात्र यावर्षी लाडक्या बहिणींचे कारण सांगत सर्वच शासकीय योजनांच्या निधीवर परिणाम झाला असून बीड जिल्ह्यालाही येणारा निधी तब्बल चार महिने उशीरा मिळाला आहे.गेल्या दोन दिवसापुर्वी जिल्ह्याला मिळालेला असून 575 कोटींपैकी 172 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी जवळपास 90 कोटी निधी हा जुन्या दायीत्वाच्या कामांसाठी खर्च झाला आहे.
बीड जिल्ह्याचा 2025-26 चा यावर्षीचा 575 कोटींचा विकास आराखडा मंजूर आहे. या मंजूर आराखड्यापैकी प्रत्येक वर्षी जुन महिन्यात हा निधी मिळत असतो. त्यामुळे जुन महिन्यापासून जुन्या दायीत्वाचा निधी आणि नवीन विकास कामांसाठी निधी खर्च करण्यात येत असतो. यावर्षी तब्बल 4 महिने उशीरा म्हणजे मागील दोन दिवसापुर्वी बीड जिल्ह्याला 172 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 42 कोटी रूपये निधी हा विमानतळ प्राधिकरणाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी खर्च झालेला आहे तर जवळपास 90 कोटी निधी हा जुन्या कामासाठी देण्यात आलेला आहे. प्राप्त झालेल्या निधीतून नवीन विकास योजने अंतर्गत थोड्या कामांना हा निधी खर्च करण्यात येणार आहे. 2024-25 मध्ये आमदार खंडातून करण्यात आलेल्या विकास कामांनाही अद्याप निधी नसल्यामुळे अनेक गुत्तेदार आणि सरपंचाचे ओरड होत आहे.








