
लाच घेताना पोलीस पकडताच एसपींनी पीआयवर केली कारवाई
उचलबांगडी करत नियंत्रण कक्षात पाठविले
पाटोदा (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये वाळुचे टेंडर नसतानाही लपूनछपून वाळू आणली जात आहे. महसूल आणि काही भ्रष्ट पोलीस अधिकार्यांच्या आशिर्वादाने वाळू येत आहे. वाळू सुरु ठेवण्यासाठी वाळू माफियांकडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना एका पोलीस कर्मचार्यास काल पाटोदायामध्ये लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडले. लाच घेताना कर्मचार्यास पकडल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी तेथील पोलीस निरीक्षकाची तात्काळ उचलबांगडी केली आहे.
वाळुची वाहतूक कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी पाटोदा पोलीस कर्मचारी सचीन तांदळे याने वालू माफियाकडे 20 हजार रुपये हप्त्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधिताने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती. सोमवारी रात्री सदरील कर्मचार्यास पाटोदा पोलीस ठाण्यासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी त्या कर्मचार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत शिनगारे, बीड उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान चिट्टमपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान कवडे, सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, संतोष राठोड, अविनाश गवळी, राजकुमार आघाव, सचीन काळे, बिभिशन सांगळे व आंबादास पुरी यांनी केली. दरम्यान पाटोदा पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस कर्मचारी रंगेहात पकडल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक काँवत यांनी दखल घेत तेथील पोलीस कर्मचारी सोमनाथ जाधव याची उचलबांगडी करत त्याची पोलीस नियंत्रण कक्षात करत चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.








