
बॅनरवर महाराजांसह जरांगेंचा फोटो असल्याने स्थानिकांत संताप
पिंपळनेर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी, दोषीला तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला केले पाचारण, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

घाटसावळी (रिपोर्टर): बीड-परळी महामार्गावर असलेल्या पोखरी (मैंदा) येथील विठ्ठल मंदिराच्या समोर लावण्यात आलेले मराठा आंदोलकांचे बॅनर अज्ञात समाज कंटकाने ब्लेड मारून फाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांसह मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे फोटो फाडण्यात आल्याने संताप अधिकचा वाढला आहे. संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी करून दोषीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ श्वानपथकाला पाचारण करत आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हा जाणीवपुर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा असल्याचे दिसून येत असल्याने या प्रकरणात दोषीवर कारवाई करावी, अशी एकीकडे मागणी होत असताना पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.

याबाबत अधिक असे की, बीड-परळी महामार्गावर घाटसावळीपासून काही अंतरावर असलेल्या पोखरी येथे चलो मुंबई हे आरक्षणाच्या आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र असलेले एक बॅनर लावण्यात आले होते. सदरचे बॅनर रात्री जाणीवपुर्वक अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आले. आज सकाळी सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर या भागातील मराठा बांधवांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सदरचा प्रकार पाहून संतापलेल्या नागरिकांनी थेट पिंपळनेर पोलीस ठाणे गाठले. दोषीला त्वरित अटक करा, सदरचा प्रकार हा जातीय तेढ निर्माण करणारा आहे, असे म्हणत या आधीही दोन वेळा असेच बॅनर फाडले होते, असेही काहींनी सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला घटनास्थळावर पाचारण करण्यात आले आहे. आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असून शांततेचे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पोखरी येथील पांडुरंग बोंगाणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








