
19 वर्षाचा तरुण जागीच ठार; आरोपी फरार
पोलीस घटनास्थळी;
पाटोदा (बीड):शिरूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात खुनासारख्या गंभीर घटना सातत्याने घडत असून परवा बीड शहरात खुनाची घटना घडल्यानंतर आज शिरूर तालुक्यातील रायमोह परिसरातील दगडवाडी येथे एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. नाशिक येथील मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसह रायमोह परिसरात आलेले आहेत. यामध्ये मेंढ्या सांभाळणारा दीपक केरा भिल्ल (वय 19, रा. बर्हाणपूर, मध्य प्रदेश) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सदरची घटना आज सकाळी पहाटेच्या दरम्यान घडली. खून करणारा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास एकनाथ भोसले (वय 52, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) याने दीपकवर वैयक्तिक कारणातून हल्ला केला. पहाटेच्या सुमारास अचानक झालेल्या या हल्ल्यात भोसले याने मोठा दगड उचलून दीपकच्या डोक्यावर प्राणघातक वार केला. या हल्ल्यात दीपक जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रायमोहा पोलिस चौकीला कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. एका निष्पाप मेंढपाळ तरुणाचा असा खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात अलिकडच्या काळात सलग घडणार्या खुनांच्या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी तागड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत असून, पोलिसांनी आरोपी विलास भोसलेला शक्य तितक्या लवकर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मृत दीपक केरा भिल्ल याचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमार्टेमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दीपक आपल्या कुटुंबासोबत मेंढ्या चारण्याच्या व्यवसायातून उदरनिर्वाह करत होता. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या खुनामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांनी या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला लवकरच अटक करून न्यायालयीन प्रक्रिया पुढे नेण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.







