
जे दिले त्याची श्वेतपत्रिका काढा, पडताळणी करा
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
पंकजा मुंडेंनी दिली माध्यमांना माहिती
मुंबई (रिपोर्टर): जे कुणबी आहेत त्यांच्या बाबत आमचे कुठलेही काहीही म्हणणे नाही. मात्र अवैध दाखल्याबाबत कुठल्याही प्रकारचे सरसकट कुणबी दाखले दिले जाऊ नयेत, आतापर्यंत जे कुणबीप्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करावी, अशी ठाम भूमिका ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांना दिली.
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीला ना. छगन भुजबळ, संजय राठोड, अतुल सावे, दत्तामामा भरणे, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह उपसमितीचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर माध्यमाशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जे कुणबी आहेत त्यांच्याबाबत आमचे कुठलेही म्हणणे नाही. मात्र अवैध दाखल्याबाबत कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये, अशी उपसमितीची भूमिका आहे. आतापर्यंत जे दाखले दिले गेलेले आहेत, त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करावी, अशी भूमिकाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ओबीसी समाज अगोदरच सामाजिक मागासलेपण भोगतोय. ओबीसी समाज हा राजकीयदृष्ट्याही मागासलेला आहे. मराठा समाजाला राजकीय मागासलेपण नाही. राजकीयदृष्ट्या मराठा समाज समृद्ध आहे. अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कावर राजकीय गदा येणार नाही याची काळजी घ्यावी व बोगस प्रमाणपत्र दिले जाऊ नये याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या, नोकरीच्या दृष्टीने मागास असलेल्या मराठा समाजाबाबत आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही, पण सरसकट प्रमाणपत्राबाबत आमची भूमिका ठाम आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.








